Join us

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा धक्का; नैसर्गिक वायूच्या किमतीत भरभक्कम वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 8:35 PM

सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता; सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार

नवी दिल्ली: सर्वसामान्यांच्या समस्या लवकरच वाढणार आहेत. मोदी सरकारनं नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये ६२ टक्क्यंनी वाढ केली आहे. नैसर्गिक वायूचा वापर खतं, वीज उत्पादन आणि सीएनजी वायू तयार करताना केला जातो. त्यामुळे सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

ओएनजीसीच्या सारख्या सरकारी कंपन्या उत्पादन घेत असलेल्या नैसर्गिक वायूची किंमत १ ऑक्टोबरपासून २.९० डॉलर प्रति १० लाख ब्रिटिश थर्मल युनिट इतकी असेल. याआधी ही किंमत १.७९ डॉलर इतकी होती. मात्र आता नवा दर लागू होणार असून पुढील ६ महिन्यांसाठी हाच दर कायम असेल. समुद्रातून काढण्यात येणाऱ्या वायूचा दर ६.१३ डॉलर प्रति १० लाख ब्रिटिश थर्मल युनिट इतका असेल. यासाठीचं नोटिफिकेशन सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.

नैसर्गिक वायूच्या दरात मोठी वाढ झाल्यानं मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरात १०-११ टक्क्यांची वाढ होईल, अशी माहिती मिंटनं उद्योग जगतातील सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. वीज उत्पादनासाठीदेखील नैसर्गिक वायूचा वापर होतो. मात्र यामुळे ग्राहकांना फारसा फटका बसणार नाही. नैसर्गिक वायूच्या मदतीनं तयार होणाऱ्या विजेचं प्रमाण कमी असल्यानं ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार नाही. मात्र खतांच्या उत्पादनासाठी येणारा खर्च वाढू शकतो. त्याचा परिणाम खतांच्या किमतींवर होईल.

टॅग्स :ओएनजीसी