मुंबई - माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सलिल एस पारेख यांच्या नावाची घोषणा केली आहे. ते येत्या 2 जानेवारीपासून पदभार संभाळतील. इन्फोसिसने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार पुढच्या पाचवर्षांसाठी सलिल पारेख यांची सीईओ आणि एमडी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पारेख सध्या फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनीच्या बोर्डावर आहेत. कॉम्प्युटर सायन्य या विषयात मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग तसेच कॉर्नेल विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय आयआयटी मुंबईमधून त्यांनी एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. नंदन नीलकेणी नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदावर कायम राहतील. हंगामी सीईओ प्रविण राव यांच्या पदामध्ये बदल करण्यात आला आहे. पारेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रविण राव कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असतील.
इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायणमुर्ती यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर 18 ऑगस्टला विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या एमडी आणि सीईओपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सिक्का यांची जागा कोण घेणार याची चर्चा सुरु होती. अखेर आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
सिक्का यांनी का सोडल पद ? सॉफ्टवेयर एक्सपोर्ट क्षेत्रातील इन्फोसिस भारताची दुस-या क्रमांकाची कंपनी आहे. इन्फोसिसचे सीईओ म्हणून सिक्का यांनी तीनवर्ष पूर्ण केली होती. कंपनीच्या कार्यालयीन कामकाज पद्धतीमध्ये झालेले बदल, नोकरी सोडणा-या कर्मचा-यांची वाढती संख्या, वेतन वाढ, कंपनी सोडणा-या कर्मचा-यांना दिले जाणारे पॅकेज यावरुन एकूणच कंपनीच्या संचालकांमध्ये नाराजी होती. कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ति यांना सुद्धा कंपनीमध्ये होत असलेले बदल पटत नव्हते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बंसल यांना मिळालेल्या पॅकेजवर त्यांनी आपत्ती नोंदवली होती.
काय म्हणाले होते विशाल सिक्काबरेच विचारमंथन केल्यानंतर मी कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या सहका-यांना राजीनाम्याची माहिती दिली आहे असे सिक्का यांनी सांगितले. पुढची सर्व प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मी पुढचे काही महिने बोर्ड आणि व्यवस्थापकीय टीमसोबत काम करत राहीन असे सिक्का यांनी कर्मचा-यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले होते. माझ्या तीनवर्षांच्या कार्यकाळात कंपनीने चांगली प्रगती केली. अनेक नवीन शोधांची प्रक्रिया सुरु झाली. तरीही मी सीईओ पदावर राहण्यास इच्छुक नाही असे सिक्का यांनी म्हटले होते. पत्रामध्ये सिक्का यांनी त्यांच्यावर अनेक आधारहीन व्यक्तीगत पातळीचे आरोप झाल्याचा उल्लेख केला होता.