वॉशिंग्टन: एकीकडे कोरोना संकटामुळे कंपन्या डबघाईला आल्या असताना मात्र काही कंपन्यांनी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा काही क्षेत्रांमध्ये मोठी पगारवाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यातच आता आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने (Microsoft) कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता आणली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, सीईओ सत्या नडेला यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अलीकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, की ते त्यांच्या अधिक गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांना जास्त पगार देणार आहे. तसेच कंपनी जागतिक गुणवत्ता बजेटला दुप्पट करणार आहे. बाजारात ‘कंपनीच्या प्रतिभेला खूप मागणी आहे आणि यामुळे आम्हाला वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. तुम्ही आमच्यासाठी मौल्यवान आहात आणि ग्राहक आणि भागीदारांना सक्षम बनवण्याचे उत्तम काम करता. ते त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक करतात, असे सत्या नडेला यांनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
कंपनीचे भविष्य उज्ज्वल असल्याचा नडेला यांना विश्वास
आम्ही आमचे जागतिक गुणवत्ता बजेट दुप्पट करत आहोत. त्याचे फायदे वेगवेगळ्या मार्केट डेटाच्या आधारे देशानुसार बदलतील आणि जास्तीत जास्त वाढ बाजाराची मागणी कुठे आहे यावर अवलंबून असेल. ६७ किंवा त्यापेक्षा कमी स्तरावरील सर्व स्तरांसाठी दरवर्षी किमान २५ टक्क्यांनी स्टॉक रेंज वाढवणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या ईमेलनंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंपनीचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास सत्या नडेला यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आधीच वाढ केली असून यामध्ये अॅमेझॉनचे नाव अग्रक्रमाने आहे. फेब्रुवारीमध्येच, Amazon ने कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान कर्मचार्यांस मूळ वेतन दुप्पट केले. ते १६०,०० डॉलर्सवरून ३५०,००० डॉलर्स केले आहे.