मुंबई : जगभरातील रेल्वेगाड्यांना पुण्याजवळील चाकण येथे तयार होणारी इंजिने लागणार आहेत. भारतातील फोर्स मोटार्स व जर्मन रोल्स रॉइस यांनी मेक इन इंडियाअंतर्गत ३०० कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार मंगळवारी केला. या इंजिनांसाठी रोल्स रॉइस त्यांचा जर्मनीतील प्रकल्प भारतात हलविणार आहे.
कार्स व इंजिनाचे उत्पादन करणाऱ्या रोल्स रॉइसचा ‘एमटीयू’ हा इंजिनाचा ब्रॅण्ड आहे. ‘एमटीयू १६००’ मालिकेच्या इंजिनाचा उपयोग ऊर्जा प्रकल्प व रेल्वेगाड्यांसाठी होतो. प्रत्येकी दीड टन वजनाची वर्षाला २००० इंजिने रोल्स रॉइस जर्मनीत तयार करते. फोर्स मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी सांगितले की, मेक इन इंडिया हा या कराराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. रोल्स रॉइसच्या या इंजिनांना जगभरातील विविध रेल्वे कंपन्यांकडून मागणी आहे.
भारतासह नेपाळ व श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पातही या इंजिनांचा उपयोग होत आहे. ही इंजिने चाकणच्या प्रकल्पात तयार होऊन जर्मनीला पाठवण्यात येतील. तेथून ती जगभरात जातील. या प्रकल्पासाठी ‘फोर्स एमटीयू पॉवर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना करण्यात आली. त्यात फोर्सची ५१ व रोल्स रॉइसची ४९ टक्के गुंतवणूक असेल. मे २०१९ पर्यंत हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. ‘बम्बार्डिअर’ ही जर्मनीत मुख्यालय असलेली कॅनडिअन कंपनी रेल्वेगाड्यांची निर्मिती करते. भारतातील मेट्रो व युरोपातील गाड्यांना या इंजिनांचा पुरवठा होईल, असे रोल्स रॉइसचे सीईओ आंद्रेस शेल यांनी सांगितले.
भारतीय अर्थव्यवस्था वेगवान
भारतीय अर्थव्यवस्था वेगवान झाली आहे. यामुळेच येथे येण्याचा निर्णय घेतला. आमच्या भारतातील केंद्रात ७० अभियंते कार्यरत आहेत. त्यांची संख्या १५० होईल आणि भविष्यात इंजिनाशी संबंधित जर्मनीतील सर्वच उत्पादने चाकणच्या केंद्रात हलविण्याची
योजना आहे.
- आंद्रेस शेल,
सीईओ, रोल्स रॉइस पॉवर सिस्टीम्स लि.