जेव्हाही तुम्ही बँकेकडून होमलोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेता, तेव्हा बँक सर्वात प्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर पाहते. क्रेडिट स्कोअर ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. क्रेडिट स्कोअरवरूनच बँका अंदाज लावतात की कर्ज घेणारी व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल तितकं कर्ज मिळणं सोपं जातं आणि ते अधिक चांगल्या व्याजदरासह उपलब्ध होईल. तर दुसरीकडे क्रेडिट स्कोअर जितका कमी असेल तितक्या कर्ज घेताना अडचणी तितक्याच अडचणी येतात.
साधारणपणे ७५० च्या वर क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. परंतु कधीकधी आपल्या काही चुकांमुळे आपला सिबिल स्कोअर खराब होतो. अशा परिस्थितीत क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा मार्ग कोणता? तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या काही चुका सुधाराव्या लागतील. चुका दुरुस्त केल्यानंतर, तुमचा स्कोअर काही दिवसात सुधारेल आणि तो ७५० च्या वरही जाण्याची शक्यता आहे.
ईएमआय वेळेवर न भरणं
जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर दरमहा त्याचे हप्ते वेळेवर फेडावे लागतात. तुम्ही वेळेवर ईएमआय भरला नाही तर त्याचा थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तुमचा कोणताही ईएमआय स्कीप होणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिटचा पर्याय निवडू शकता. यामुळे ठरलेल्या तारखेला ठरलेला इएमआय आपोआप कट होईल.
सातत्यानं अनसिक्युर्ड लोन घेणं
अनसिक्युर्ड लोन हे असे कर्ज आहे ज्याला वैयक्तिक कर्जाप्रमाणे कोणत्याही तारणाची आवश्यकता नसते. दोनपेक्षा जास्त अनसिक्युर्ड लोन कधीही घेऊ नये. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. जेव्हा तुम्हाला खूप गरज असते आणि कोणताही मार्ग नसतो तेव्हाच या प्रकारच्या कर्जाचा पर्याय निवडा. कर्ज घेतल्यानंतर त्याची वेळेवर परतफेड करा.
अनेक कर्ज घेणं
एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होण्याचीही शक्यता असते. बर्याच वेळा, एकाच वेळी अनेक कर्जे चालू असल्यामुळे, ईएमआय जास्त होतो आणि वेळेवर परतफेड करणे कठीण होते. अशा परिस्थितीत तुमचा क्रेडिट स्कोअर बिघडतो. एका वेळी अनेक कर्जे घेण्याचा प्रकार टाळा.
गँरेंटर बनताना विचार करा
एखाद्याचे लोन गॅरेंटर किंवा जॉईंट अकाऊंट होल्डर होण्याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या कारण जर जॉईंट अकाऊंट होल्डर किंवा कर्जदार ज्याच्या कर्जासाठी तुम्ही गॅरेंटर झाला आहात त्यानं काही चूक केली तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होईल.
क्रेडिट कार्डावरून अधिक खर्च
कोणत्याही क्रेडिट कार्डावरून अधिक केला जाणारा खर्च तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतो. यावरून तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही विचाराशिवाय खर्च करता असा समज होतो. स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुम्ही दर महिन्याला आपल्या क्रेडिट लिमिटच्या ३० टक्क्यांपर्यंतच रक्कम खर्च करा.
कधीही कर्ज न घेणं
तुम्ही जर कधीही कर्ज घेतलं नसेल किंवा क्रेडिट कार्डाचा वापर केला नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर मायनस मध्ये असतो. अशात तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही हे बँकेला समजत नाही. अशा स्थितीत बँक तुम्हाला लोन देताना विचार करतात. अशात तुमच्याकडे दोन पर्याय असू शकतात. पहिला पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड घेऊन त्याचा वापर करत वेळेवर हप्ते फेडा आणि दुसरा म्हणजे छोट्या एफडी करून त्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत कर्ज घ्या.
लोन सेटलमेंट
तुमच्या लोन सेटलमेंटचा उल्लेख तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्येही होतो. जेव्हा तुम्ही लोन सेटलमेंट करता तेव्हा तुमचं लोन अकाऊंट सेटल्ड दिसतं. याचा अर्थ तुम्ही लोनची ठरलेली रक्कम फेडली नाही. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर ५० किंवा १०० पॉईंट्स किंवा त्यापेक्षा अधिक अंकांनी कमी होऊ शकतो.