Join us

व्याजदरात कपातीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:18 AM

महागाईच्या दरात विक्रमी घसरण झाल्यामुळे २ आॅगस्ट रोजीच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात किमान पाव (0.२५%) टक्क्याची कपात केली जाऊ शकते

नवी दिल्ली : महागाईच्या दरात विक्रमी घसरण झाल्यामुळे २ आॅगस्ट रोजीच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात किमान पाव (0.२५%) टक्क्याची कपात केली जाऊ शकते, अशी माहिती अर्थव्यवस्थेतील विविध वित्तीय संस्थांकडून मिळाली आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण आढावा समिती बुधवारी, २ आॅगस्ट रोजी आपला निर्णय जाहीर करणार आहे.अर्थतज्ज्ञ आणि बँकर्सनी सांगितले की, महागाई वाढण्याच्या धोक्याचे कारण देऊन रिझर्व्ह बँकेने सलग चार आढाव्यांत धोरणात्मक व्याजदर (रेपो रेट) ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आता त्यात कपात होऊ शकते.बँक आॅफ महाराष्टÑचे व्यवस्थापकीय संचालक आर. पी. मराठे यांनी सांगितले की, धोरणात्मक व्याजदरात किमान २५ आधार अंकांची कपात होईल, अशी आमची अपेक्षा आहे. एक तर महागाईचा दर आता कमालीचा घटला आहे. दुसरे म्हणजे औद्योगिक वृद्धीदरही नरमाई दर्शवीत आहे. दरकपातीमुळे कर्जवृद्धीला उत्तेजन मिळेल. गेल्या अनेक तिमाहींपासून तीही कमजोरच आहे.इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक किशोर खरात यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात 0.२५ टक्क्यांची कपात केली जाऊ शकते. रोख रोखतेचे प्रमाण आणि वैधानिक तरलता प्रमाण यात रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही कपात होणार नाही, असे दिसते. कारण सध्या अर्थव्यवस्थेत पुरेशी तरलता आहे.एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी सांगितले की, दरकपातीसाठी अनेक महिन्यांपासून परिस्थिती पूरक आहे.तथापि, आढावा समितीवर अनेक सदस्य आहेत. त्यांना निर्णय घ्यायचा आहे. महागाई कमी झाली हे खरे आहे, पण ती याच पातळीवर कायम राहील का, असाही प्रश्न आहे. अशा परिस्थितीत समिती काय निर्णय घेईल, काहीच सांगता येत नाही.महागाई आणखी कमी होईल-एसबीआयने त्यांच्या इकोरॅपनावाच्या अहवालातही व्याजदर कपातीचा अंदाज व्यक्त केला आहे. या अहवालात म्हटले की, देशभरात मान्सूनची स्थिती चांगली आहे. अनेक ठिकाणी पावसाने सरासरी ओलांडली आहे. शिवाय जीएसटीमुळे महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. येत्या काळात त्याचा सकारात्मक परिणाम महागाई निर्देशांकावर दिसून येईल. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी व्याजदर कपात करण्यास रिझर्व्ह बँकेला वाव आहे.