मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्यासंबंधीचे प्रकरण परस्पर वाटाघाटी पद्धतीने सोडविले जाईल, असे संकेत‘सेबी’ने दिले आहेत. याप्रकरणी ‘सेबी’ने २४ मे रोजी बँकेला नोटीस बजावली होती.चंदा कोचर यांनी पदाचा दुरूपयोग करीत पती दीपक कोचर हे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या नूपॉवर कंपनीला कर्ज दिले. व्हिडीओकॉनचे वेणूगोपाल धूत यांचीही या कंपनीत भागिदारी होती. पुढे हे कर्ज बुडित खात्यात गेले. याप्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता व त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, अशी चर्चा होती. याबद्दल ‘सेबी’ने बँक व चंदा कोचर या दोघांनाही व्यवहारातील अनियमितीकरणाची नोटीस बजावली होती.बँकेने या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे नोटिशीच्या उत्तरात कळवले होते. पण त्यानंतर कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. अद्यापही हे प्रकरण ‘सेबी’कडे प्रलंबित आहे. हे प्रकरण आता परस्पर वाटाघाटी पद्धतीने सोडविण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचे ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी यांनी स्पष्ट केले आहे.तर दोषारोप रद्द होतील, दोन्हीकडून प्रयत्नपरस्पर वाटाघाटीमध्ये नोटीस बजावलेली कंपनी किंवा बँक यांना ठराविक शुल्क ‘सेबी’कडे भरावे लागते. त्याखेरीज त्यांच्यावर विशिष्ट निर्बंध आणले जातात. या दोन्हीला बँकेने होकार दिल्यास त्यांच्यावरील दोषारोप रद्द केले जातात. यासाठी आता ‘सेबी’ व आयसीआयसीआय या दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
चंदा कोचर प्रकरण वाटाघाटीने सोडवणार; ‘सेबी’चे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 5:19 AM