मुंबई : व्हिडिओकॉन उद्योग समूहाला भ्रष्ट मार्गाने कर्ज दिल्याच्या आरोपावरून चंदा कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या एमडी व सीईओपदावरून पूर्वलक्षी प्रभावाने हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना एप्रिल २००९ पासून मिळालेला १० कोटी रुपयांचा बोनस आणि एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईएसओपी) अंतर्गत बँकेकडून बक्षीस स्वरूपात मिळालेले सुमारे ३४६ कोटी रुपयांचे समभाग परत करावे लागणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी केलेल्या चौकशीत कोचर दोषी ठरल्या आहेत. ही चौकशी सुरू असतानाच गेल्या वर्षी १८ जून रोजी त्या रजेवर गेल्या होत्या. त्यानंतर ४ आॅक्टोबर रोजी त्यांनी राजीनामा दिला होता. तथापि, आता आयसीआयसीआय बँकेने त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने निलंबित केले आहे.
बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोचर यांनी बँकेच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून काढण्यात येत आहे. या काळात त्यांना मिळालेला बोनस आणि ईएसओपी समभाग परत करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सीबीआयने व्हिडीओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्यासह चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर एफआयआर नोंदविला आहे.
कारवाई धक्कादायक - चंदा कोचर
न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अहवालावरून आपल्यावर करण्यात आलेली कारवाई निराश करणारी दु:खद आणि धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी व्यक्त केली आहे. कोचर यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी पुन्हा सांगू इच्छिते की, आयसीआयसीआय बँकेचे कर्ज देण्याविषयीचे निर्णय एकतर्फी नसतात. अनेक जाणकारांच्या समितीकडून हे निर्णय घेतले जातात. त्यामुळे हितसंघर्षाचा प्रश्नच निर्माण होत नाही.
चंदा कोचर यांना परत करावे लागणार ३४६ कोटींचे समभाग
आयसीआयसीआयची कारवाई; १० कोटींचा बोनसही मागितला परत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 04:21 AM2019-02-01T04:21:56+5:302019-02-01T04:22:27+5:30