नवी दिल्ली- ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांना परदेशात जात असताना इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशाबाहेर जाण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आलं. सीबीआयने राजीव कोचर यांना व्हिडीओकॉन समूहाशी झालेल्या आर्थिक व्यवहारातल्या घोटाळ्यासंबंधी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलं आहे.
तसेच सीबीआयनं राजीव कोचर यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलरही बजावलं आहे. ICICI बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 2012मध्ये 3250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे. त्या प्रकरणात सीबीआयने आधीच ICICI बँकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. व्हिडीओकॉन समूहाने 2008मध्ये दीपक कोचर यांच्याशी भागीदारी करत नू-पॉवर कंपनीची स्थापना केली.
दीपक कोचर हे ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती आहेत. ICICI बँकेनं दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाची भागीदारी लक्षात घेता त्यांना कर्जपुरवठा केल्याचा सीबीआयला संशय आहे. तसेच व्हिडीओकॉन समूहाला ICICI बँकेनं दिलेलं कर्ज अद्याप फेडता न आल्यानं सीबीआयनंही आता त्यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लावला आहे. ICICI बँकेनं चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना व्हिडीओकॉन समूह व त्याच्या प्रवर्तकांना बेकायदा पद्धतीनं कर्ज दिल्याची तक्रार ‘एसएफआयओ’ कार्यालयात करण्यात आली आहे.