Join us  

टाटा सन्सवर चंद्रशेखरन यांची नियुक्ती अवैध

By admin | Published: January 19, 2017 4:48 AM

टाटा सन्सच्या चेअरमनपदी करण्यात आलेल्या नटराजन चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला सायरस मिस्त्री यांनी विरोध केला

मुंबई : टाटा सन्सच्या चेअरमनपदी करण्यात आलेल्या नटराजन चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला सायरस मिस्त्री यांनी विरोध केला असून, या निर्णयाला ते कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मागच्याच आठवड्यात मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या आदल्या दिवशी सदस्यांना पत्र लिहून चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीच्या कायदेशीर वैधतेबाबत आक्षेप घेतला होता. आॅक्टोबरमध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीबाबत जारी करण्यात आलेल्या विषयपत्रिकेत मिस्त्री यांना हटविण्याबाबतचा उल्लेख नव्हता. याच बैठकीत मिस्त्री यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नटराजन चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीबाबत बोलावलेल्या बैठकीत काय होऊ शकते, हे संचालक मंडळाचे सदस्य जाणून होते. मिस्त्री हे अजूनही टाटा सन्सचे संचालक असून, बैठकीची विषयपत्रिका मिस्त्री यांनाही मिळाली होती. नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी नियुक्तीची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत मिस्त्री सहभागी झाले नव्हते.२४ आॅक्टोबर २०१६ रोजी मिस्त्री यांना हटविण्यात आले होते. या निर्णयाला मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात (एनसीएलटी) आव्हान दिले आहे. टाटा सन्स आणि टाटा समूहाच्या विश्वस्तांदरम्यान साटेलोटो असल्याचा तसेच टाटा समूहाच्या अल्प समभागधारकांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप मिस्त्री यांनी या आव्हान याचिकेत केला आहे. मिस्त्री यांची कायदेशीर लढ्याची रणनीती नेमकी काय असेल, हे सांगता येत नसली तरी काही जाणकारांच्या मते ते कोर्टात नवीन याचिका दाखल करू शकतात.>मिस्त्री यांचा दावा...६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण बैठक बोलाविण्याचा निर्णय म्हणजे टाटा सन्सच्या वकिलांनी एनसीएलटीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन आहे, असा आरोप मिस्त्री यांच्या गुंतवणूक कंपन्यांनी (सायरस इन्व्हेस्टमेन्ट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेन्ट) अवमानना याचिकेत केला आहे.११ जानेवारी २०१७ रोजी संचालक मंडळाच्या सदस्यांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये मिस्त्री यांनी असे म्हटले आहे की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती अवैध आहे.नियमातहत नियुक्ती...१२ जानेवारी २०१७ रोजी टाटा सन्सची बैठक झाली. या बैठकीत टाटा सन्सच्या चेअरमनपदी नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली. टाटा सन्सच्या नियमानुसार आणि संबंधित कायद्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा टाटा सन्सच्या प्रवक्त्याने केला आहे.