Join us

चंद्राबाबू नायडू, TDP च्या माजी खासदाराच्या कंपनीची चर्चा, शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 1:44 PM

Multibagger Stock: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात ज्या दोन कंपन्यांची खूप चर्चा आहे. या कंपन्यांचा संबंध चंद्राबाबू नायडू आणि टीडीपीशी आहे.

Multibagger Stock: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात ज्या दोन कंपन्यांची खूप चर्चा आहे त्या म्हणजे हेरिटेज फूड्स लिमिटेड (Heritage Foods Ltd) आणि अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड (Amara Raja Energy). या दोन्ही कंपन्यांचे थेट संबंध टीडीपी आणि एनडीएचे प्रमुख सहकारी चंद्राबाबू नायडू यांच्याशी आहेत. हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या शेअरनं आज पुन्हा १० टक्क्यांच्या अपर सर्किटला धडक दिली. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

आज पुन्हा अप्पर सर्किट 

हेरिटेज फूड्सच्या शेअरचा भाव आज १० टक्क्यांच्या अपर सर्किटनंतर ६०१.१५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे. गेल्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १० दिवसांत ५५ टक्क्यांनी वाढ झाली. सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. ज्यानंतर बीएसईमध्ये सर्किट बदलण्यात आलं. 

चंद्राबाबू नायडूंनी सुरू केली कंपनी  

हेरिटेज ग्रुपची स्थापना चंद्राबाबू नायडू यांनी १९९२ मध्ये केली होती. कंपनीचे सध्या तीन व्यवसाय आहेत. ही कंपनी डेअरी, रिटेल आणि कृषी क्षेत्रात काम करते. चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. मार्चपर्यंत हेरिटेज फूड्समध्ये प्रवर्तकांचा एकूण हिस्सा ४१.३० टक्के आहे. यात चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीचा सर्वात मोठा वाटा आहे. मार्च २०२४ पर्यंत कंपनीत त्यांचा एकूण हिस्सा २४.३७ टक्के आहे. 

'हा' शेअर ३२ टक्क्यांनी वधारला 

अमारा राजाबद्दल बोलायचं झालं तर २ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीचा शेअर आज ९ टक्क्यांनी वधारून १३३२.७५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. बीएसईवर ही या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी आहे. अमारा राजाचे एमडी जयदेव गल्ला हे टीडीपीचे माजी खासदार आहेत. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारचंद्राबाबू नायडूव्यवसाय