- चिन्मय काळेमुंबई : खात्यात किमान शिल्लक नसल्याबद्दल बँकांनी खातेदारांकडून मागील आर्थिक वर्षात ५ हजार कोटी रुपये वसूल केले असून त्यात स्टेट बँक सर्वोच्च स्थानी होती, असे वृत्त ‘लोकमत’ ने नुकतेच प्रकाशित केले होते. पण या वृत्तानंतर हादरलेल्या स्टेट बँकेने ग्राहकांना शुल्कापासून वाचण्यासाठी खातेप्रकारच बदलावा, असा अजब सल्ला दिला आहे.सरकारी व खासगी क्षेत्रातील बँकांनी खातेदारांकडून खात्यात किमान रक्कम नसल्याबद्दल भरमसाठ शुल्क वसूल केले. स्टेट बँकेने यापोटी २४३३ कोटी वसूल केल्याचे समोर आले. यासंदर्भातील वृत्तानंतर स्टेट बँकेने लगेच सारवासारव करीत शुल्क वसुलीत कपात केल्याचा दावा केला.किमान शिल्लक रक्कमेचा आकडा ४० टक्क्यांपर्यंत घटविण्यात आला आहे. याखेरीज आकारल्या जाणाऱ्या शुल्कात महानगरे व शहरांमध्ये ७० टक्के तसेच ग्रामीण भागात ७५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्यानंतरही खातेदारांना या शुल्कापासून स्वत:चा बचाव करायचा असल्यास त्यांनी त्यांची खाती ‘बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट’ (बीएसबीडी) मध्ये परावर्तित करावी. विनाशुल्क खातेप्रकार बदलता येईल, असे स्पष्टीकरण बँकेकडून याबाबत देण्यात आले आहे.>रोख रक्कमेच्या निर्बधांचे बीएसबीडी खाते‘बीएसबीडी’ प्रकारच्या खात्यात किमान शिल्लक नसल्यास कुठलेही शुल्क आकारले जात नाही. पण या खात्यातून किंवा एटीएममधून रोख रक्कम काढता येत नाही. कुठल्याही प्रकारचे रोख व्यवहार या खात्याद्वारे करता येत नाहीत. केवळ डिजिटल व्यवहारांना परवानगी असते. अधिकाधिक खाती ही ‘बीएसबीडी’ प्रकारची असावी, यासाठी केंद्र सरकारकडून बँकांवर जबरदस्त दबाव आहे. त्यासाठीच स्टेट बँकेने स्वत:ची बाजू मांडताना असा विचित्र सल्ला खातेदारांना दिला आहे. स्टेट बँकेत सध्या ४२.५ कोटी बचत खाती असून त्यापैकी ४० टक्के खाती ‘बीएसबीडी’ प्रकारची आहेत.
किमान शिलकीअभावी दंड टाळण्यासाठी खातेप्रकार बदला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 4:00 AM