Elon Musk: टेस्ला आणि X चे मालक इलॉन मस्क (Elon Musk) त्यांच्या ट्वीट्समुळे नेहमी चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांच्या एका नवीन ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इलॉन मस्क यांनी थेट विकिपीडियाला (Wikipedia) एक अब्ज डॉलर्सची ऑफर दिली आहे. मात्र, यासाठी त्यांनी विकिपीडियाचे नाव बदलण्याची अटही घातली आहे.
इलॉन मस्कने एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यावर विकिपीडिया विक्रीसाठी नाही, असे लिहिले होते. मस्कने स्लीपिंग फेस इमोजीसह हे ट्वीट केले होते. आणखी एका ट्विटमध्ये मस्क म्हणतात, विकिमीडिया फाऊंडेशनला इतके पैसे का हवे आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? विकिपीडिया चालवणे नक्कीच आवश्यक नाही. मस्कच्या या ट्विटला 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दरम्यान, अलीकडच्या काळात इलॉन मस्क आणि विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांच्यात वाद निर्माण झाला होता. जिमी वेल्स यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्गॉन यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना कथित सेन्सॉर केल्याबद्दल आणि मुक्त भाषणाला परवानगी न दिल्याबद्दल मस्क यांच्यावर टीका केली होती.