नवी दिल्ली- 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींमध्ये अनेक छोटे-मोठे बदल होणार आहेत. या बदलांसंदर्भात आपणही सजग राहिलं पाहिजे. भारतात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते, ही वीजचोरी रोखण्यासाठीही अनेक उपाय योजण्यात आले. परंतु त्यात अद्याप यश आलेलं नाही. वीजचोरी रोखण्यासाठी आता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय आणला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विजेची चोरी रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून प्रत्येक घरात प्रीपेड मीटर लावणं गरजेचं होणार आहे.केंद्र सरकारनं 2022 पर्यंतची मुदत दिली असून, पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे. मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल. त्यात शिल्लक रक्कम असेपर्यंत वीज वापरता येईल. ती संपताच वीजपुरवठा बंद होईल आणि कार्ड रीचार्ज करताच तो सुरू होईल. मागेल त्याला वीज योजनेखाली वर्षभरात 2.26 कोटी नव्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या.ग्राहकांची संख्या दररोज वाढत आहे. मीटर तपासून, त्यानुसार बिले पाठविणे व वसुली करणे आता वीज कंपन्यांना अवघड होत आहे. बिले विलंबाने गेल्याने वसुलीही वेळेत करता येत नाही. त्यामुळे वीज कंपन्यांचा तोटाही वाढत आहे. त्यातून चुकीची व प्रचंड बिले आल्याच्या तक्रारी येतात. स्मार्ट मीटरमुळे मोठ्या प्रमाणात वीजचोरी रोखणं शक्य होणार आहे. अविरत विजेचा पुरवठायेत्या 1 एप्रिल किंवा त्याआधीही सर्व ग्राहकांना अविरत वीज पुरविणे कंपन्यांना सक्तीचे होईल. मध्यंतरी राज्यांनी मागेल त्याला वीज पुरविण्याचे सामंजस्य करार केंद्राशी केले होते. त्याचाच हा भाग आहे. फक्त अपवादात्मक परिस्थितीत संबंधित राज्याचा वीज नियामक आयोग वीज कंपनीस यात सवलत देऊ शकेल.
1 एप्रिलपासून स्मार्ट होणार आपलं वीज मीटर, मिळणार 'हा' फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 9:22 AM