खरे तर महिन्याच्या सुरुवातीला अनेक गोष्टींमध्ये छोटे-मोठे बदल होत असतात. काही वस्तूंचे भाव वाढतात तर काहींचे कमी होतात. मे महिन्यातही असेच काहीसे दिसणार आहे. या महिन्याची सुरवातही काहीशा, अशाच बदलांनी होत आहे. तर जाणून घेऊयात आपल्यासाठी कशी होतेय मे महिन्याची सुरुवात...
सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता -
या महिन्याच्या सुरुवातीलाही गॅस सिलिंडरच्या किंमतींसंदर्भात कंपन्या काही निर्णय घेऊ शकतात. घरगुती गॅसच्या दरातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वेळी गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
सलग चार दिवस बँका बंद राहणार -
आपल्याला वारंवार बँकांमध्ये जावे लागत असेल, तर मे महिन्याची सुरुवात आपल्यासाठी काहीशी खराब असू शकते. कारण 1 मे ते 4 मे पर्यंत सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, या सुट्या वेगवेगळ्या राज्यांत त्यांच्या पद्धतीने असतील. देशात मे महिन्याच्या सुरुवातीलाच ईद साजरी केली जाईल. याशिवाय, शनिवार आणि रविवारचा विचार करता, मे महिन्यात तब्बल 11 दिवस बँका बंद राहतील.
IPO मध्ये UPI पेमेंटची मर्यादा वाढणार -
1 मेपासून होणाऱ्या काही मोठ्या बदलांमध्ये, महत्वाचा बदल म्हणजे, रिटेल इंव्हेस्टर्ससाठी UPI पेमेंटची मर्यादा वाढविली जाणार आहे. सेबीच्या नव्या नियमांनुसार, 1 मेनंतर, कुठल्याही कंपनीच्या IPO मध्ये इंव्हेस्ट करण्यासाठी UPI च्या माध्यमाने पेमेंट करताना आपण 5 लाख रुपयांपर्यंतची बोली सब्मिट करू शकता. ही मर्यादा सध्या दोन लाख रुपयांची आहे. आता ही नवी मर्यादा 1 मेनंतर येणाऱ्या सर्व आयपीओंसाठी लागू असेल.