सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पैशाशी संबंधित अनेक नियम पुढील महिन्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून (Rules Changes From October 2023) बदलणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. तुमच्यासाठी या नियमांची माहिती असणं महत्त्वाचं आहे. असं न झाल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला १ ऑक्टोबरपासून होणार्या या बदलांची माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना समोरं जावं लागणार नाही. १ ऑक्टोबरपासून काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊ.
२ हजार रुपये
तुमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर हे काम लगेच करा. रिझर्व्ह बँकेनं सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर या नोटा चालणार नाहीत. अशा परिस्थितीत दोन हजार रुपयांची नोट नक्कीच बदलून घ्या. जर तुम्ही पुढील महिन्यापासून परदेशी टूर पॅकेज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ७ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीचं टूर पॅकेज खरेदी केल्यास तुम्हाला ५ टक्के टीसीएस भरावा लागेल. तसंच ७ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या टूर पॅकेजसाठी २० टक्के टीसीएस भरावा लागेल.
खातं होईल फ्रीज
सेबीनं डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नॉमिनेशन अनिवार्य केलं आहे. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल. या तारखेपर्यंत कोणत्याही खातेदारानं नॉमिनेशन केलं नाही तर ते खाते १ ऑक्टोबरपासून गोठवलं जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही. यापूर्वी, सेबीनं डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांच्या नॉमिनेशनची अंतिम मुदत ३१ मार्च निश्चित केली होती, जी नंतर सहा महिन्यांनी वाढवण्यात आली.
छोट्या बचत खात्यासाठी आधार
आता छोट्या बचत योजनांमध्ये आधार अनिवार्य करण्यात आलेय. पीपीएफ, सुकन्या समृद्धी, पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादींमध्ये आधारची माहिती देणे आवश्यक आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर ताबडतोब बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि ही माहिती द्या. असं न केल्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून ही खाती गोठवली जातील.