Join us  

मुदत ठेवींच्या नियमांत रिझर्व्ह बँकेने केले बदल; व्याज मिळणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 5:38 AM

रिझर्व्ह बँकेने नियमांत केलेल्या बदलांनुसार, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांनी परताव्याची रक्कम मागितली नाही, तर त्यावर मिळणारे व्याज कमी होऊ शकते.

ठळक मुद्देएखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षे मुदतीच्या एफडीमध्ये पैसे गुंतवले असतील, तसेच ही ठेव आज परिपक्व होणार असतानाही गुंतवणूकदाराने पैसे काढण्यासाठी दावा केला नसेल

नवी दिल्ली : बँकांच्या मुदत ठेवींच्या (फिक्स्ड डिपॉजिट) नियमांमध्ये रिझर्व्ह बँकेने बदल केले आहेत. त्यामुळे मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतविण्याचा विचार करीत असाल, तर आधी बदललेले नियम पाहून घेणे हितावह ठरेल. 

रिझर्व्ह बँकेने नियमांत केलेल्या बदलांनुसार, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांनी परताव्याची रक्कम मागितली नाही, तर त्यावर मिळणारे व्याज कमी होऊ शकते. हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकेच असेल. सध्या ५ ते १० वर्षांच्या दीर्घ अवधीसाठी मुदत ठेवींवर ५ टक्क्यांच्या आसपास व्याज मिळते. बचत खात्यांवरील व्याजदर ३ ते ४ टक्क्यांच्या आसपास असतो.

एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षे मुदतीच्या एफडीमध्ये पैसे गुंतवले असतील, तसेच ही ठेव आज परिपक्व होणार असतानाही गुंतवणूकदाराने पैसे काढण्यासाठी दावा केला नसेल, तर अशा परिस्थितीत त्या गुंतवणूकदारास नव्या नियमानुसार बचत खात्यातील ठेवीप्रमाणे व्याज मिळत राहील. त्यामुळे एफडी परिपक्व झाल्यानंतर लगेच दावा दाखल करा; अन्यथा तेथून पुढच्या कालावधीचे व्याज बचत खात्याप्रमाणे मिळेल. यामुळे गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागणार आहे. याआधी एफडी परिपक्व झाल्यानंतरही पैसे काढण्यासाठी दावा दाखल केला नसेल, तर तेवढ्याच अवधीसाठी ती पुढे वाढवली जात असे, तसेच व्याजदरही त्यावेळी असलेल्या मुदत ठेवीच्या दरानुसार कायम ठेवला जात असे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसा