जपानच्याशेअर बाजारामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी जपाननं आपला शेअर बाजार बेअरिश फेजमध्ये आल्याचं म्हटलं. गेल्या आठवड्यापासून जपानच्या बाजारात सातत्यानं घसरण होत आहे. सोमवारी जपानचा निक्केई २२५ निर्देशांक २२२७.१५ अंकांनी म्हणजेच १२ टक्क्यांहून अधिक घसरला. ११ जुलै रोजी निक्केई निर्देशांक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून २० टक्क्यांहून अधिक घसरला होता.
निक्केईमध्ये १९८७ नंतर प्रथमच एवढी भीषण घसरण झाली आहे. १९८७ चा तो दिवस जपानच्या शेअर बाजाराच्या इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. १९८७ मध्ये एका दिवसात निक्केई ४४५१.२८ अंकांनी घसरला होता. जी जपान निक्केईच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण आहे.
सोमवारी निक्केई १२.४ टक्क्यांनी घसरून ३१,४५८.४२ वर बंद झाला. या घसरणीमुळे निक्केईने यंदा आपली संपूर्ण तेजी गमावली आहे. यंदा आतापर्यंतचा परतावा पाहता निक्केई तोट्यात आला.
निक्केईमधील सर्व मोठे शेअर्स जोरदार आपटलेत. मित्सुबिसी, मित्सुई अँड कंपनी, सुमितोमो आणि मारुबेनी या कंपन्यांचे शेअर्स १४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. तर मित्सुईचे मार्केट कॅप २० टक्क्यांहून अधिक घसरले आहे. शुक्रवारी जपानच्या निक्केई २२५ वर भीती कायम होती आणि शेअर बाजारात घसरण सुरुच राहिली.
दक्षिण कोरियाचा बाजारही आपटला
दक्षिण कोरिया निर्देशांक कोस्पीवरही मोठा परिणाम दिसून आला. कोस्पी ८.७७ टक्क्यांनी घसरून २४४१.५५ वर बंद झाला, तर स्मॉलकॅप कोडॅक ११.३ टक्क्यांनी घसरून ६९१.२८ वर बंद झाला.
प्रचंड घसरणीत एक्स्चेंजनं सर्किट हिट केल्यानं कोस्पीचा व्यापार काही काळ थांबवावा लागला. स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी २० मिनिटे आणि कॉसडॅक निर्देशांक दुपारी १ वाजून ५६ मिनिटांनी ठप्प झाला. दक्षिण कोरियाच्या शेअर बाजार निर्देशांकाचं सर्किट ८ टक्क्यांवर आहे. जेव्हा जेव्हा बाजार एका वेळी ८ टक्क्यांपेक्षा जास्त कोसळतो, तेव्हा सर्किटमुळे बाजारातील व्यवहार थांबतात.
हाँगकाँग, चीनवर परिणाम नाही
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जपानचा हाँगकाँग आणि चीनच्या शेअर बाजारावर अधिक परिणाम झालेला नाही. या बाजारांमध्ये सर्वात कमी घसरण दिसून आली आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १.६१ टक्क्यांनी तर चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स-३०० केवळ ०.४८ टक्क्यांनी घसरला.