Join us

काय सांगता! ChatGPTकडे पैशांची मागणी; फक्त एका मिनिटांत व्यक्तीच्या खात्यावर १७ हजार जमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 1:20 PM

ChatGptमुळे लोकांना पैसे मिळण्यात मदत होत असल्याचे सांगितले जात आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या...

ChatGpt: गेल्या काही दिवसांपासून ChatGPT संदर्भात अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येताना दिसत आहे. चॅटजीपीटी करत असलेल्या कारनाम्यांमुळे अनेक जण अवाक् होताना दिसत आहेत. यातच आता एका व्यक्तीने ChatGPTकडे पैशांची मागणी केली होती. आणि केवळ एकाच मिनिटांत त्या व्यक्तीच्या खात्यावर १७ हजार रुपये जमा झाले, असे सांगितले जात आहे. DoNotPay चे CEO जोशुआ ब्राऊडर यांनी यासंदर्भात आपला अनुभव शेअर केला आहे.   

मी नवीन चॅटजीपीटी ब्राऊझिंग एक्स्टेंशनला माझ्यासाठी काही पैसे शोधण्यास सांगितले. एका मिनिटात कॅलिफोर्निया सरकारकडून माझ्या खात्यात २१० डॉलर म्हणजेच १७ हजार रुपये जमा झाले, असे जोशुआ ब्राऊडर यांनी ट्विटवर हा अनुभव शेअर करताना सांगितले. ChatGPT ला त्यांचे हरवलेले पैसे मिळवण्यात मदत करण्यास सांगितले आणि काही काळानंतर त्यांच्या खात्यात २१० डॉलर म्हणजेच १७,२०० रुपये जमा झाले. 

AI ने त्यांना संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजावून सांगितली

ब्राऊडर म्हणतात की, ChatGPTने पहिल्यांदा कॅलिफोर्निया स्टेट कंट्रोलरच्या वेबसाइटवर जाण्यास सांगितले. या वेबसाइटवर दावा न केलेल्या निधीची माहिती दिली आहे. उदाहरणार्थ, जर एखादी कंपनी तुम्हाला परतावा देऊ इच्छित असेल, परंतु ती तुमच्याशी संपर्क साधू शकली नसेल तर हा निधी या वेबसाइटवर उपलब्ध असतो. ChatGPT ने मग ब्राउडरला सांगितले की, ते त्याच्या पैशांवर कसा दावा करू शकतात. AI ने त्यांना संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजावून सांगितल्याचा ब्राउडर यांनी दावा केला आहे.

दरम्यान, ChatGPT च्या माध्यमातून १ मिनिटात २१० डॉलर खात्यात कसे हस्तांतरित केले गेले, याचीही माहितीही ब्राउडर यांनी दिली आहे. DoNotPay च्या सीईओने असेही सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टप्पे स्वतः पूर्ण करू शकते. मात्र, असे इंटिग्रेशन केल्याने कंपन्यांचे नुकसान होईल. केवळ कॅप्चा चॅटजीपीटीला ही प्रक्रिया पूर्ण करण्यापासून रोखू शकत असल्याचेही ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पैसाआर्टिफिशिअल इंटेलिजन्स