नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा चिंताजनक वेगाने होत असलेला फैलाव आणि त्याला रोखण्यासाठी वाढत असलेला लॉकडाऊनचा कालावधी यामुळे देशातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सवलतीनंतर देशातील उद्योग व्यवहार अंशत: सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी पेट्रोलवरील व्हॅट वाढवला आहे. त्यामुळे काही राज्यांत पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र अशी काही राज्ये आहेत जिथे आजही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोलची किंमत कमी आहे.
सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले असले तरी देशातील बहुतांश राज्यात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवण्यात आलेले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारांकडून पेट्रोल, डिझेलवर अतिरिक्त कर लावण्यात आले आहे. मात्र अरुणाचल प्रदेश हे राज्य याला अपवाद ठरले आहे. अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथे देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत आहे. येथे पेट्रोलची किंमत ६६.१२ रुपये प्रतिलिटर इतकी आहे. तर येथे डिझेलही इतर भागांच्या तुलनेत स्वस्त आहे. येथे डिझेल ६०.०८ रुपये एवढी आहे.
तर देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानमध्ये मिळत आहे. राजस्थानमधील गंगानगर येथे आज पेट्रोलचा भाव ८०.४९ रुपये प्रतिलिटर आहे. तर इथे डिझेलची किंमत ७३.३२ रुपये प्रतिलिटर आहे.
दरम्यान, दिल्ली सरकराने व्हॅटमध्ये वाढ केल्याने दिल्लीमध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. मात्र असे असले तरी देशातील इतर शहरांच्या तुलनेत राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे भाव कमी आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ७१.२६ रुपये प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ७५.५४ रुपये, कोलकातामध्ये ७३.३० रुपये आणि मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी ७६.३१ रुपये मोजावे लागत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार
coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह
भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती
दिल्ली सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर दिल्लीमध्ये पेट्रोल १.६७ रुपयांनी तर डिझेल ७.१० रुपयांनी महागले आहे. आज दिल्लीमध्ये एक लिटर डिझेलसाठी ६९.३९ रुपये मोजावे लागत आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी चेन्नईमध्ये ६८.२२, कोलकातामध्ये ६५.६२ आणि मुंबईत ६६.२१ रुपये मोजावे लागत आहेत.