न्यूयाॅर्क : लहान मुलांना खेळण्यांचे प्रचंड आकर्षण असते. काळाप्रमाणे खेळणीही बदलली. अलीकडच्या काळात राेबाेटसारखी स्मार्ट खेळणी मुलांच्या भावविश्वात प्रवेश करू लागली आहे. अशा खेळण्यांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. पुढील ५ वर्षांमध्ये ही बाजारपेठ १० ते १२ पटींनी वाढून ५.२५ लाख काेटी रुपयांपर्यंत हाेणार आहे. वाढदिवस, समारंभ, सुट्ट्यांमध्ये मुलांना भेट म्हणून स्मार्ट खेळणी देण्याकडे कल वाढलेला दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
स्मार्ट खेळणी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित आहेत. ती इंटरॲक्टिव्ह आहेत. मुलांसाेबत त्यांचे माेबाईल गेम्सही त्यांच्याशी कनेक्ट करता येतात. ॲलेक्सा किंवा सिरी हे या खेळण्यांशी कनेक्ट करुन मुलांना एक वेगळीच अनुभूती देतात. केवळ एका टचवर मुलांना जगभरातील माहिती मिळते. मुलांशी बाेलून खेळणारी ही खेळणी साहजिकच घरात जागा घेऊ लागली आहेत. काेराेनाकाळात ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा माेबाईलवर जास्त वेळ जात आहे. त्यामुळे अशा तांत्रिक खेळण्यांसाेबत मुलांनाही कनेक्ट करण्यावर पालकांचाही जाेर आहे. त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल, अशी पालकांची अपेक्षा असते. मात्र, यासाेबत धाेकाही घरात येत आहे.
मुलांच्या हेरगिरीचा धाेका
स्मार्ट खेळण्यांमध्ये मायक्राेफाेन, कॅमेरा व इतर उपकरणे असतात. त्यातून मुलांची हेरगिरी व माहिती चाेरण्याचा आराेप हाेऊ लागला आहे. मुलांच्या वैयक्तिक अधिकारांचे हे उल्लंघन आहे. मात्र, काही खेळण्यांचा गैरवापर हाेऊ शकताे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.