नवी दिल्ली - दैनंदिन जिवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, काही लोक या समस्यांकडे काना डोळा करून पुढे निघून जातात. काही लोक त्या समस्यांसाठी इतरांना दोष देत बसतात. तर काही लोक त्या समस्यांवर उपाय शोधून काढतात आणि तो समाजापर्यंत पोहोचवून त्या समस्येवर मात करतात. अशीच एक समस्या आहे दुषित पाण्याची. आजही अनेक भागांत शुद्ध पाणी मिळत नाही. मात्र या समस्येवर उपाय शोधून काढला आणि तो समाजापर्यंत पोहोचवला, तो महेश गुप्ता यांनी.
दुषित पाण्यानं आजारी पडायची मुलं -
महेश गुप्ता यांनी IIT कानपूर येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी सरकारी कंपनी इंडियन ऑईलमध्ये अधिकारी म्हणून नोकरीही केली. याच काळात गुप्ता यांच्या मुलांना वारंवार काळीव होत होता. या कारणामुळे त्यांना नोकरीही सोडावी लागली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुषित पाण्यामुळे त्याची मुलं वारंवार आजारी पडत. यानंतर त्यांनी दुषित पाण्याच्या समस्येवर तोडगा शोधण्यासंदर्भात विचार करायला सुरुवात केली आणि त्यांना एक अशी आयडिया सुचली की, जिने त्यांची मुलंच बरी झाली नाही, तर त्यांना KENT RO सुरू करण्याची प्रेरणाही मिळाली.
बाजारातील RO पाणी योग्य पद्धतीने शुद्ध करू शकत नव्हते -
गुप्ता यांनी बाजारातून एक वॉटर प्यूरिफॉयर आणले. मात्र, ते त्यावर समाधानी नव्हते. कारण त्यावेळी बाजारात मिळणारे आरओ अल्ट्राव्हायलेट टेक्नॉलॉजीवर बेस्ड होते. यामुळे ते पाणी पूर्णपणे शुद्ध करू शकत नव्हते. यानंतर गुप्ता यांनी स्वतःच रिव्हर्स ऑस्मॉसिसवर आधारित प्यूरिफायर तयार करण्याचे ठरवले. यानंतर त्यांनी 1998 मध्ये आरओ तयार करण्याचे काम सुरू केले आणि आपल्या कंपनीचे नाव केंट आरओ (KENT RO), असे ठेवले.
5 हजार रुपयांपासून झाली सुरुवात -
महेश गुप्ता यांनी आपल्या कंपनीची सुरूवात केवळ ५ हजार रुपयांपासून केली होती. विक्रिसाठी जेव्हा फायनल प्रोडक्ट तयार झाले तेव्हा एका आरओची किंमत २० हजार रुपये एवढी होती. ठेवण्यात आली होती. हे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर आरओंच्या तुलनेत महाग होते. मात्र केंटचे फायदे पाहून त्यावरील लोकांचा विश्वास वाढला आणि मागणीही वाढली. यानंतर चांगल्या मार्केटिंगसाठी गुप्ता यांनी हेमा मालिनी यांना केंट आरओचे ब्रँड अँबेसडर बनवले आणि 5 हजार रुपयांपासून सुरू झालेली ही कंपनी बघता बघता आता 1100 कोटींवर पोहोचली आहे.