चंद्रकांत दडस, उपसंपादक
प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलाने आपल्यापेक्षा उत्तम जीवन जगावे. जग फिरावे, भरपूर पैसे कमवावेत. पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या जन्मापासूनच जर त्याच्या नावाने गुंतवणूक करू लागलो तर मुले तरुण होईपर्यंतच ते श्रीमंत होतील. कसे ते पाहू...
दीर्घकालीन गुंतवणूक
योग्य गुंतवणूक योजनेद्वारे तुम्ही तुमचे मूल तरुण होईपर्यंत त्याला करोडपती बनवू शकता. गुंतवणुकीचे उद्दिष्ट किमान ७ वर्षे असल्यास शेअर बाजारात गुंतवणूक करा. मुलासाठी गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय ठेवून पैसे गुंतवत राहा. याच वेळी विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवत राहा. या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा.
इक्विटी फंड
इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. गुंतवणूकदार २-४ सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडांमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करू शकतात. जर २१व्या वर्षी मुलासाठी १ कोटी रुपये आवश्यक असतील तर १२ टक्के वार्षिक परताव्याच्या अंदाजासह दरमहा तुम्हाला किमान ९ हजार रुपये गुंतवावे लागतील.
बाल विमा योजना
इक्विटी फंडांव्यतिरिक्त, एखादी व्यक्ती जीवन विमा कंपन्यांच्या चाइल्ड प्लॅनमध्येदेखील गुंतवणूक करू शकते. असे चाइल्ड प्लॅन एंडोमेंट आणि युलिप या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे प्रीमियम सवलतीचा पर्यायदेखील असतो. म्हणजेच, पालकांच्या मृत्यूनंतर, विमा कंपनी उर्वरित प्रीमियम भरते आणि निर्धारित कालावधीनंतर मुलाला इच्छित रक्कम मिळते.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना हीदेखील मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली योजना आहे. पालक मुलगी १४ वर्षे वयाची होईपर्यंत गुंतवणूक करू शकतात. सध्या त्यावर ७.६ टक्के वार्षिक व्याज मिळते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तुम्हाला व्याजासह एकरकमी रक्कम मिळेल.
पीपीएफ खाते उघडा
मुलाच्या नावाने पीपीएफ खाते उघडणे हादेखील एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असतो. त्यावर सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे. यासोबतच गुंतवणुकीवर करात सवलतही मिळते. जास्त परताव्याच्या या सर्व गुंतवणुकींच्या पर्यायांमध्ये इक्विटी फंडात जास्तीत जास्त रक्कम ठेवा. या सर्व पर्यायांमध्ये सतत गुंतवणूक केल्यास मुलाला तरुण वयातच मोठी रक्कम हाताला मिळेल. यातून परदेशी शिक्षण, व्यवसाय करता येईल. त्यामुळे त्याचे आयुष्य समृद्ध होईल. मुलाचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी त्याची जबाबदारी म्हणून गुंतवणुकीला तत्काळ सुरुवात करा.