नवी दिल्लीदेशात शेतकऱ्यांचं नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आली आहे. भारत-चीन सीमेवर तणाव असतानाही चीनने तब्बल ३० वर्षांनंतर भारताकडून तांदळाची आयात करण्यास सुरुवात केली आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
भारतातून येणारा तांदूळ स्वस्त मिळत असल्याने चीनने पुन्हा एकदा भारताकडून तांदूळ आयात करण्यास सुरुवात केलीय. तांदळाची निर्यात करणारा भारत सर्वात मोठा देश आहे. तर चीन हा देश तांदळाची आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. बिजिंगकडून दरवर्षी तब्बल ४ दशलक्ष टन इतका तांदूळ खरेदी केला जातो. पण भारत सर्वाधिक निर्यात करणारा देश असूनही चीनकडून भारतातून तांदूळ आयात केला जात नव्हता. यासाठी भारतीय तांदळाच्या गुणवत्तेला चीनकडून वारंवार दोष दिला जात होता.
चीनने आता भारताच्या तांदळाच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचं सांगत भारताकडून तांदुळ खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या काळात चीन भारताकडून आणखी तांदूळ आयात करेल अशी अपेक्षा असल्याचं तांदूळ निर्यात असोसिएशनचे अध्यक्ष बीव्ही कृष्णा राव यांनी सांगितलं.
भारतीय व्यापाऱ्यांनी तब्बल १ लाख टन तांदूळ चीनला निर्यात करण्याचा करार केला आहे आणि हा करार डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यासाठीचा आहे. आतापर्यंत चीनकडून थायलँड, व्हिएतनाम, म्यानमार आणि पाकिस्तान या देशांतून तांदळाची आयात केली जात होती. विशेष म्हणजे, भारताच्या तुलनेत या देशांकडून प्रती टन ३० डॉलर अधिक किंमत मोजून चीन तांदूळ खरेदी करत होता.