ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - जागतिक बाजारात जोरदार घसरण झाल्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारही चांगलाच गडगडला असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक १६०० अंकांनी खाली घसरला आहे. तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकांतही ४५५ पेक्षा अधिक अंकांची घसरण झाल्याने शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला आहे. चीनमधील मंदीचा धसका भारतीय शेअर बाजारानेही घेतला. सोमवारी बाजार सुरु होताच घसरणीला सुरुवात झाली व दुपारनंतर परिस्थितीत आणखी खालावली. सेन्सेक्समध्ये तब्बल १६२४ अंकांची घसरण झाली व निर्देशांक थेट २५, ७४१ वर बंद झाला. तर निफ्टीही ४९० अंकांनी घसरुन ७,८०९ वर बंद झाला.
चीनी चलनाचे झालेले अवमूल्यन हे या घसरणीमागचे मोठं कारण मानले जात आहे. शांघाय शेअर बाजारातील शेअर्स ७.७ टक्के घसरले असून या घसरणीमुळे आशियाई शेअर्स तीन वर्षांच्या नीचांकी पाततळीवर पोचले आहेत.
दरम्यान या घसरणीचा परिणाम रुपयाच्या किंमतीवरही झाला असून एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ६६.४९ इतकी झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वात नीचांकी दर ठरला आहे.
दरम्यान शेअर बाजारातील घसरणीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी सध्या काळजीचे काही कारण नसल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत असल्याचेही ते म्हणाले. भारतीय बाजारात लवकरच स्थिरता येईल असा विश्वास व्यक्त करत केंद्र सरकार व आरबीआय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
सात लाख कोटी रुपये बुडाले
चीनमधील बाजारपेठेतील घसरणीचा फटका आता भारतीय शेअर बाजारालाही बसला आहे. सोमवारी शेअर बाजारातील ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटी रुपयांची नुकसान झाल्याचे समजते.
सात वर्षातील नीचांक
सोमवारी शेअर बाजारात झालेली घसरण ही गेल्या सात वर्षातील नीचांक असल्याचे सांगितले. यापूर्वी २१ जानेवारी २००८ मध्ये शेअर बाजारात २,०६२ अंकांची घसरण झाली होती. तर बीएसईच्या इतिसाहातील ही चौथी सर्वात मोठी घसरण आहे.
चीनमुळे मंदी
चीनच्या उत्पादन क्षेत्रात सध्या मंदी असून याचा फटका आता जगभराला बसत आहे. चीनने शेअर बाजाराला तारण्यासाठी पेंशन फंडमधील सुमारे ५४७ अब्ज डॉलर्स शेअर बाजारात गुंतवण्याचा आश्यर्यकारक निर्णय घेतला. मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही व चिनी अर्थव्यवस्थेची घसरण सुरुच आहे. सोमवारी चीनच्या शेअर बाजारात गेल्या सात वर्षातील नीचांक गाठल्याचे समजते.
अमेरिकेतील शेअर बाजारही गडगडला
चीनमधील मंदीनंतर अमेरिकेतील वॉल स्ट्रीट येथील शेअर बाजारही गडगडला आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील शेअर बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली. चीनच्या मंदीचा आणखी एक फटका म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली ऐतिहासिक घसरण. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरलमागे ४० डॉलरच्या खाली आहे. आर्थिक दिवाळखोरीच्या संकटात सापडलेल्या ग्रीसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची डोकेदुखी वाढली आहे.