China News : वर्ष बदललं असलं तरी चीनमधील परिस्थिती बदललेली नाही. त्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दररोज धक्कादायक बातम्या येत असतात. देश अद्याप कोरोनाच्या प्रभावातून बाहेर आलेला नाही आणि एका नव्या विषाणूनं हाहाकार माजवला आहे. दरम्यान, चीनचा ३० वर्षांचा बॉण्ड यील्ड इतिहासात पहिल्यांदाच याच कालावधीत जापानच्या बॉण्डच्या खाली घसरला आहे. गेल्या सहा तिमाहीत चीन मंदीच्या स्थितीत आहे. जापान अनेक दशकांनंतर चलनवाढीच्या स्थितीतून बाहेर आला असून आता चीन आता त्याच गर्तेत जात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
गेल्या चार वर्षांत चीनच्या बॉण्ड यील्डमध्ये २१५ बेसिस पॉईंट्सची घसरण झाली आहे. या काळात जपानच्या बॉण्ड यील्डमध्ये १६० बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. एकेकाळी जपानची अर्थव्यवस्था खूप वेगानं वाढत होती, पण १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ती इतक्या गर्तेत अडकली होती की त्यातून बाहेर पडायला अनेक दशके लागली. २५ वर्षे देश मंदीच्या गर्तेत होता. चीनही सहा तिमाहींपासून चलनवाढीच्या गर्तेत अडकला असून त्यातून बाहेर पडण्याची सध्या तरी शक्यता नाही. डिफ्लेशन म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत झालेली घसरण. हे इनफ्लेशनच्या उलट आहे.
मंदीचा धोका
चीनमधील या परिस्थितीला रिअल इस्टेटचं संकट मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. २०२१ मध्ये देशात याची सुरूवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत १८ ट्रिलियन डॉलरची संपत्ती गमावली आहे. चीनच्या उर्वरित अर्थव्यवस्थेवरही हे संकट ग्रासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा एक तृतीयांश आहे. देशात कोट्यवधी फ्लॅट रिकामे आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेत पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे.
कर्ज जीडीपीच्या २०० टक्क्यांपेक्षा अधिक
चीनमध्ये खासगी क्षेत्राचे कर्ज प्रथमच जीडीपीच्या २०० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. देशातील मनुष्यबळात पहिल्यांदाच घट झाली आहे. ही सर्व चिन्हं चीन मंदीच्या गर्तेत अडकण्याची आहेत. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून ती मंदीच्या गर्तेत आली तर त्याचा फटका संपूर्ण जगाला बसेल. याचा परिणाम जागतिक इक्विटी, कमॉडिटी आणि बॉण्ड बाजारावर होऊ शकतो. चीन आपल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचं स्टिम्युलस पॅकेज देत आहे, पण त्याला अद्याप यश आलेलं नाही.