Join us

चीन प्रथमच करणार भारतीय तांदळाची आयात; १ लाख टनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 12:23 AM

दरवेळी गुणवत्तेचे कारण सांगत भारतीय तांदळाला नाकारणाऱ्या चीनला भारताकडून तांदूळ आयात करावा लागत आहे. ३०० डॉलर प्रतिटन या दराने भारताने चीनला तांदूळ निर्यात करण्याचे ठरवले आहे.

नवी दिल्ली : एकीकडे प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारताच्या कुरापती काढणाऱ्या चीनने आता तांदळासाठी भारताकडेच हात पसरले आहेत. गुणवत्तेचे कारण पुढे करत भारतीय तांदळाला नाकारणाऱ्या चीनने भारताकडून यंदा एक लाख टन तांदूळ आयात करण्याचे ठरवले आहे.चीन दरवर्षी चाळीस लाख टन तांदळाची आयात करतो. थायलंड, व्हिएतनाम, ब्रह्मदेश आणि पाकिस्तान या देशांकडून चीन दरवर्षी तांदूळ आयात करत असतो. यंदा मात्र या सर्व देशांनी आपल्याकडील उत्पादन कमी झाल्याने चीनला तांदूळ निर्यात करण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे दरवेळी गुणवत्तेचे कारण सांगत भारतीय तांदळाला नाकारणाऱ्या चीनला भारताकडून तांदूळ आयात करावा लागत आहे. ३०० डॉलर प्रतिटन या दराने भारताने चीनला तांदूळ निर्यात करण्याचे ठरवले आहे.

आयात वाढणे शक्यइतर देशांच्या तुलनेत ३० डॉलरने हा दर कमी आहे. चीनने प्रथमच भारतीय तांदळाची मागणी केली आहे. तांदळाची गुणवत्ता पाहून नजीकच्या भविष्यात चीन आयात वाढवू शकतो, असा आशावाद भारतीय तांदूळ निर्यात संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही. कृष्णराव यांनी व्यक्त केला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत चीनला भारतीय तुकडा तांदूळ निर्यात केला जाणार असल्याचे कृष्णराव यांनी सांगितले.

 

टॅग्स :भारतचीन