Join us

चीनने सुरू केल्या ‘5G’च्या चाचण्या

By admin | Published: October 06, 2016 5:59 AM

जगातील सर्वाधिक मोबाइल वापरकर्ते असलेल्या चीनने आपल्या १00 शहरांत ५जी दूरसंचार सेवेच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. पुढील पिढीतील दूरसंचार सेवेत अग्रेसर राहण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले

बीजिंग : जगातील सर्वाधिक मोबाइल वापरकर्ते असलेल्या चीनने आपल्या १00 शहरांत ५जी दूरसंचार सेवेच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. पुढील पिढीतील दूरसंचार सेवेत अग्रेसर राहण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.हाँगकाँगमधील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने या संबंधीचे वृत्त दिले आहे. ५जी दूरसंचार नेटवर्क ४जीच्या तुलनेत २0 पट अधिक गतिमान आहे, तसेच त्यात डाटा लॉस होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. ५जीसोबत बहुअँटेना यंत्रणेचीही चाचणी घेतली जात आहे. एकाच वेळी अधिक वापकर्ते या यंत्रणेद्वारे हाताळता येऊ शकतात. त्यामुळे मोबाइल डाटा वापराची क्षमता वाढते. चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वांत मोठी ४जी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये २0१५ च्या अखेरीस सध्या १.३ अब्ज वापरकर्ते होते. यापैकी ३0 टक्के ग्राहक ४जी नेटवर्क वापरतात. ५जी नेटवर्कद्वारे २0 गिगाबाइट्स प्रति सेकंड इतकी गतिमान सेवा दिली जाऊ शकते. ४जीची गती १ गिगाबाइट प्रति सेकंद इतकीच आहे. यावरून ५जीच्या गतीची कल्पना यावी. ४जीची लॅटन्सी १0 मिलीसेकंद आहे. ५जीची १ मिलीसेकंद आहे. एखाद्या अ‍ॅपला क्लिक केल्यानंतर प्रत्युत्तर येण्यासाठी जो वेळ लागतो, त्याला लॅटन्सी असे म्हणतात.आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून ५जीचे निकष ठरविण्यात आलेले नाहीत. संयुक्त राष्ट्रांचा भाग असलेल्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियनच्या अपेक्षेनुसार, ५जीचे निकष ठरल्यानंतर २0२0 मध्ये त्या संबंधीचे नेटवर्क उभारणी सुरू होऊ शकेल. ५जी तंत्रज्ञानास आयएमटी-२0२0 असेही म्हटले जाते. जगातील दूरसंचार उद्योगाला ५जीसाठी एकच एक निकष असावा असे वाटते. (वृत्तसंस्था)