china loses : भारताला कायम पाण्यात पाहणाऱ्या चीनची अवस्था सध्या चक्रव्यूहात अडकल्यासारखी झाली आहे. एकीकडे आर्थिक मंदीमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडं मोडलं आहे. ट्रम्प टॅरिफमुळे अनेक उद्योग अडचणीत आलेत. आर्थिक पॅकेज घोषित करुनही अर्थव्यवस्थेला बळ मिळत नाही, अशा दुहेरी अवस्थेत सापडलेल्या चीनला तब्बल ७ अब्ज अमेरिकन डॉलरचा फटका बसला आहे. श्रीलंका देशाशी संबंधित हे प्रकरण आहे. या नुकसानामुळे चीनचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
श्रीलंकेच्या बाह्य कर्जाच्या पुनर्गठनामुळे चीनला ७ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. कर्जाचे पुनर्गठन म्हणजे कर्जदाराला कर्जाची परतफेड करण्यास आर्थिक अडचणी येत असल्यास, विद्यमान कर्जाच्या अटींमध्ये बदल करणे, जसे की मुदत वाढवणे, व्याजदर कमी करणे किंवा परतफेडीचे वेळापत्रक बदलणे. सरकारी वृत्तपत्र 'डेली न्यूज'ने कोलंबोतील चीनचे राजदूत क्यूई झेनहोंग यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. यामध्ये झेनहोंग म्हणाले की, चीन हा श्रीलंकेला ऑक्टोबर २०२३ मध्ये पुनर्रचना करार करणारा पहिला द्विपक्षीय कर्जदाता होता. वास्तविक, जनतेला या तपशीलांची माहिती नाही. कारण, आम्ही श्रीलंकेला दिलेली मदत (सार्वजनिकरित्या) उघड करत नाही.
चीन वठणीवर आला?
श्रीलंकेने २०२२ मध्ये आर्थिक संकटात अडकल्यानंतर दिवाळखोर घोषित केल्यानंतर ४६ अब्ज डॉलर किमतीच्या बाह्य कर्जाची पुनर्रचना केली होती. भविष्यात श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रांताच्या विकासासाठी चीन आणि भारत संयुक्तपणे काम करतील, अशी आशाही राजदूतांनी व्यक्त केली. चीनचा भारताशी कोणताही वाद नाही, कारण दोन्ही देशांनी वेगाने प्रगती केली असून समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी एकत्र काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. राजदूत म्हणाले की मला आशा आहे की चीन, भारत आणि श्रीलंका एक दिवस येथे एक व्यवहार्य प्रकल्प राबविण्यासाठी एकत्र काम करतील.
नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचं कौतुक
याआधी सोमवारी चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत-चीन संबंधांवर केलेल्या सकारात्मक टिप्पणीचे कौतुक केले, ज्यामध्ये त्यांनी वादाऐवजी संवादावर भर दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदींच्या टिप्पण्यांशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, चीनने चीन-भारत संबंधांबाबत पंतप्रधान मोदींच्या अलीकडील सकारात्मक टिप्पणीची दखल घेतली असून त्यांचे कौतुक केले आहे.