Join us

चीनच्या मंदीने बाजार उतरला

By admin | Published: September 02, 2015 11:16 PM

विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा कोणताही सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून आलेला नाही.

मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा कोणताही सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून आलेला नाही. चीनमधील मंदीमुळे बाजारात बुधवारीही मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजार २४२.८८ अंकांनी घसरून २५,४५३.५६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६८.८५ अंकांनी घसरून ७,७१७.00 अंकांवर बंद झाला.चीनमधील मंदीचा परिणाम जगभरात दिसू लागला आहे. चीनप्रमाणेच युरोप आणि अमेरिकेतील कारखाना उत्पादनाने आकडे कमजोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल काही उपाययोजना जाहीर केल्या होत्या. विदेशी गुंतवणूकदारांना किमान पर्यायी कर (मॅट) मागच्या तारखेने लावण्यात येणार नाही, अशी घोषणा त्याअंतर्गत करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम आज बाजारावर दिसेल, असे मानले जात होते. तथापि, तसे घडले नाही. सकाळी बाजारात थोडे चैतन्य दिसून आले. सेन्सेक्स २५,८९१.९५ अंकांवर तेजीसह उघडला. त्यानंतर तो २५,९३९.३७ अंकांपर्यंत वर चढला. त्यानंतर मात्र नफा वसुली सुरू झाली आणि बाजार खाली आला. २४२.८८ अंकांची अथवा 0.९५ टक्क्याची घसरण नोंदवून सेन्सेक्स २५,४५३.५६ अंकांवर बंद झाला. ८ आॅगस्ट २0१४ नंतरची ही सर्वांत नीचांकी पातळी ठरली आहे. त्या दिवशी बाजार २५,३२९.१४ अंकांवर बंद झालाहोता. सेन्सेक्सप्रमाणेच व्यापक आधारावरील निफ्टीही घसरून ७,७00 अंकांच्या खाली आला. ६८.८५ अंकांची अथवा 0.८८ अंकाची घसरण नोंदवून निफ्टी ७,७१७.00 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी भेलचा समभाग सर्वाधिक ५.१0 टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल एम अँड एमचा समभाग ३.५६ टक्क्यांनी घसरला. घसरणीचा फटका बसलेल्या अन्य बड्या कंपन्यांत ओएनजीसी, एसबीआय, कोल इंडिया, एनटीपीसी, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, सिप्ला, बजाज आॅटो आणि एल अँड टी यांचा समावेश आहे. घसरणीचा कल असतानाही काही कंपन्यांचे समभाग वाढल्याचे दिसून आले. टीसीएस, टाटा स्टील, आयटीसी, आरआयएल, इन्फोसिस, लुपीन, गेल आदी कंपन्यांचा त्यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)