बीजिंग : कोरोना विषाणूचे संकट तसेच अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या व्यापारी तणावाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात चीनची निर्यात सुमारे साडेसात टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे कोरोनाच्या संकटातून चीन हळूहळू बाहेर पडत असून, त्याची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा झेप घेण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. चीनने शुक्रवारी अधिकृतरीत्या आपले आयात-निर्यातीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार जुलै महिन्यात चीनची एकूण निर्यात २३७.६ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी राहिली. जून महिन्याच्या तुलनेत निर्यातीमध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत निर्यातीमध्ये ७.५ टक्क्यांची वाढ झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारावरून गेले वर्षभर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे हे दोन्ही देश परस्परांच्या वस्तूंवर अधिक कर लादून दुसऱ्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत असतात, असे असतानाही जुलै महिन्यामध्ये चीनमधून अमेरिकेला झालेल्या निर्यातीत १२.५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात चीनची आयात १.४ टक्क्यांनी कमी होऊन १७५.३ अब्ज डॉलरवर आली आहे.
चीनमध्ये सर्वात प्रथम कोरोनाचा उद्रेक झाला. डिसेंबर २०१९ पासून चीनची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यानंतर जगभरातील अन्य देशांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊन तेथील अर्थव्यवस्थाही ठप्प झाल्या. परिणामी जागतिक अर्थव्यवस्था ठप्प झाली असून, त्यामध्ये कधी सुधारणा होते याकडे लक्ष लागून आहे. चीनने अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे जाहीर केले. लवकरच जगातील अन्य अर्थव्यवस्थाही सुधारू लागतील, अशी आशा व्यक्त होत आहे. जूनच्या तिमाहीमध्ये चीनने एकूण देशांतर्गत उत्पादनात ३.२ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
फ्रान्सच्या निर्यातीमध्ये २१.५ टक्क्यांनी घट
फ्रान्सने शुक्रवारी आयात-निर्यातविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. यावरून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निर्यातीमध्ये २१.५ टक्क्यांनी घट झाली आहे. फ्रान्सचे परकीय व्यापार मंत्री फ्रँक रिस्टर यांनी सांगितले की, सध्या देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीत झालेली ही घट असामान्यच आहे. या सहामाहीत फ्रान्सची आयातही कमी झाली असल्याने आयात-निर्यात व्यवहारातील तफावत कमी झाली आहे ही एकच समाधानाची बाब मानावी लागेल. चालू सहामाहीतील निर्यातीतली घट ही २००९ सालच्या महामंदीमध्ये झालेल्या घटीपेक्षा जास्त आहे.