बीजिंग : चीनचा विकासदर २०१५ मध्ये ६.९ टक्के इतका होता. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात कमी विकासदर असल्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमाकांच्या चीनच्या अर्थव्यवस्थेविषयी देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी चिनी नेत्यांना सात टक्के विकासदराची अपेक्षा होती; पण तो गाठता आलेला नाही. चिनी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे जागतिक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. २०१५ च्या शेवटच्या तिमाहीत चीनचा विकासदर ६.८ असल्याचे मंगळवारी चीनच्या राष्ट्रीय आकडेवारी कार्यालयाने जाहीर केले. त्यानुसार वर्षभराचा विकासदर ६.९ असून, हा शतकातील सर्वात कमी विकासदर नोंदला गेला आहे. १९९० मध्ये तिएनानमेन चौक घटनेमुळे चीनशी सर्व जगाने संबंध तोडले होते, तेव्हाही विकासदर कमी झाला होता; पण ती तात्पुरती स्थिती होती. चीनच्या राष्ट्रीय आकडेवारी कार्यालयाने आज अधिकृतरीत्या विकासदराचे आकडे प्रसिद्ध केले. त्यानुसार यंदा गेल्यावर्षीसारखीच अर्थव्यवस्था स्थिर असेल. २०१५ मध्ये चिनी नेत्यांनी ७ टक्के विकासाचे लक्ष्य निर्धारित केले होते; पण ते गाठता आले नाही. हाँगकाँगच्या सिटी बँक इंटरनॅशनलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ लिओ क्यून म्हणाले की, अर्थव्यवस्था स्थिरतेकडे वाटचाल करीत आहे; पण अजून स्थिर झालेली नाही. निरीक्षकांच्या मते विकासदर जर ६.८ टक्क्यांपेक्षा कमी झाला, तर शासन विशेष पॅकेज देऊन दर सावरण्याचा प्रयत्न करील तसेच मूलभूत क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करील. चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे गेल्या वर्षी शेवटच्या तिमाहीत त्यांचा शेअर बाजार गडगडला होता, त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाले. त्यावेळी गुंतवणूकदारांचे ३.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले. शेअर बाजार सावरण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता. राष्ट्रीय आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादन डिसेंबर महिन्यात ५.९ टक्के होते. नोव्हेंबरात ते ६.२ टक्के इतके होते. यामध्ये उद्योगांमधील उत्पादन, खाणी व वर्कशॉपमधील उत्पादन मोजले जाते. लिओ यांच्या म्हणण्यानुसार यंदा अर्थव्यवस्था मोठी झेप घेऊ शकेल, असे वाटत नाही. पैसा व आर्थिक धोरणांमध्ये अजून मोकळेपणा आणला पाहिजे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, जगातील परिस्थितीमुळे निर्यात कमी झाली आहे, शिवाय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कमी झाली आहे. ही दोन आव्हाने वर्षभर देशासमोर आहेत. २०१५ मध्ये चीनमध्ये सर्वच क्षेत्रांची घसरण झाल्याचे आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१४ मध्ये नागरी स्थिर भांडवली गुंतवणूक १५.७ होती. गेल्यावर्षी ती १० टक्क्यांपर्यंत खाली आली. २०१४ मध्ये किरकोळ विक्रीवाढीचा दर १२ टक्के होता, तोही १०.७ पर्यंत खाली आला.चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे केंद्रीय उद्योग व व्यापारमंत्री निर्मला सीतारामण यांनी गेल्या आठवड्यात चिंता व्यक्त केली. भारतीय निर्यात त्यामुळे महाग झाली, परिणामी आपली व्यापारी तूट वाढली आहे. चीनच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नामध्ये २०१५ मध्ये सेवाक्षेत्राचा ५०.५ टक्के इतका वाटा होता. उत्पादन क्षेत्राची मात्र पीछेहाट झाली असून या क्षेत्राचा वाटा ४८.१ टक्के इतका होता. सतत तीन दशकांपासून उत्पादन क्षेत्राची पीछेहाट कायम आहे.
चीनचा वृद्धीदर २५ वर्षांच्या नीचांकावर
By admin | Published: January 20, 2016 3:13 AM