प्रसाद गो. जोशी
युरोपामध्ये होऊ घातलेली व्याज दरवाढ आणि चीनच्यामहागाईची गुरुवारी जाहीर होणारी आकडेवारी यावरच आगामी सप्ताहातील बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे. देशांतर्गत काहीच प्रमुख घडामोडी अपेक्षित नसल्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडीच बाजाराची दिशा ठरवतील. अन्य अर्थव्यवस्थांपेक्षा भारतीय अर्थव्यवस्था चांगली वाढ दाखवत असल्यामुळे परकीय गुंतवणुकीचा भारताकडे सुरू असलेला ओघ कायम राहण्याची शक्यता असून भारतीय बाजारात वाढ होण्याचा अंदाज आहे.
गतसप्ताहामध्ये बाजार बराच अस्थिर होता. त्यामुळे बाजारात मोठ्या घसरणी आणि चढाया बघायला मिळाल्या. असे असले तरी सप्ताहाचा विचार करता सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ स्वरूपात घट झाली. सप्ताहात सेन्सेक्स २९.९९ अंशांनी तर निफ्टी १९.४५ अंशांनी खाली येऊन बंद झाला. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनी अनुक्रमे ३४४.९१ आणि ३८४.९३ अंशांची वाढ नोंदविली. यामुळे बाजारावर एकूणच नकारात्मक परिणाम फारसा दिसून आलेला नाही.
आगामी सप्ताहात युरोपच्या सेंट्रल बॅंकेची होणारी बैठक आणि चीनमधील चलनवाढीची जाहीर होणारी आकडेवारी या प्रमुख घडामाेडी आहेत. याशिवाय खनिज तेलाच्या किमती आणि रुपयाचे मूल्य यावरही बाजारातील घडामोडी ठरणार आहेत.
परकीय वित्तसंस्थांची २० महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक
दोन महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी ऑगस्ट महिन्यामध्ये २० महिन्यांमधील सर्वोच्च गुंतवणूक केली आहे. गतसप्ताहात या संस्थांनी १३०५.५४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर देशांतर्गत वित्तसस्थांनी २३०.२५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता परकीय वित्तसंस्थांनी भारतात ५१,२०० कोटी रुपये गुंतविले आहेत. याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्था मात्र विक्री करीत असलेल्या दिसून आल्या.
बाजारमूल्य वाढले दीड लाख कोटींनी
गतसप्ताहात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ घट झाली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याने बाजारातील सर्व नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवल १,५०,६२१.७९ कोटी रुपयांनी वाढून ते २,७८,४६,७३३.३९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील सप्ताहात बाजाराचे भांडवलमूल्य घटले होते.