नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्या आकर्षक ऑफर्स देत असतात. चीनमधील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अलिबाबानेही एका सेलचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये रेकॉर्डब्रेक विक्री करण्यात आली आहे. अलिबाबाने रविवारी (11 नोव्हेंबर) तब्बल 213.5 अरब युआन म्हणजेच जवळपास 22 खर्व 55 अब्जची विक्री केली आहे. एका दिवसाच्या सेलमध्ये सर्वाधिक विक्री करणारी अलिबाबा ही पहिली चिनी वेबसाईट ठरली आहे.
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, अलिबाबा दरवर्षी 11 नोव्हेंबरला सिंगल्स डे सेलचं आयोजन करते. या सेलमध्ये यंदा अॅपल, शाओमी आणि डायसन या ब्रँडच्या वस्तू सर्वाधिक विकल्या गेल्या आहेत. या सेलमध्ये अलिबाबा आकर्षक ऑफर देत असल्याने चीनमधील लोक या सेलची आतूरतेने वाट पाहत असतात. अलिबाबाचे सीईओ डेनियल झांग यांनी व्यापाऱ्यांनी इंटरनेटला पूर्णपणे स्विकारले असून विक्री वाढवण्यात मदत करत असल्याचं म्हटलं आहे. चीनमधील कोसळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढता आयातदर या कशाचाच परिणाम अलीबाबाच्या 'सेल' वर झालेला नसल्याचंही त्यांनी म्हटलं.