सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- भारतात सध्या सर्वाधिक सौरऊर्जा चिनी सोलर पॅनल्सवर तयार होते आहे. पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या उत्पादनांवर भारतात बहिष्कार घाला, असे आवाहन देशातल्या विविध संघटना एकीकडे करीत आहेत, त्याचवेळी सौरऊर्जा उत्पादनांच्या भारतीय बाजारपेठेवर चिनी सोलर मोड्युल व सेल्सचा प्रभाव वाढतच चालला आहे.
सरकारने भारतीय सोलर मोड्युल व सेल्स तयार करणाऱ्या उत्पादकांशी याबाबत प्राथमिक चर्चाही केली आहे. चीन आणि तैवानमधून भारतात आयात होणाऱ्या सोलर उत्पादनावर आयात कर लावला जावा, अशी भारतीय सोलर उद्योगाची मागणी होती. सरकारने मात्र त्याऐवजी देशी उद्योगांना प्रोत्साहन देणारी योजना राबवण्याचे ठरवले. नवीन व नवीकरण ऊर्जा मंत्रालयाने यासंबंधी एक टिपण तयार केले असून लवकरच त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
>असा वाढत गेला ड्रॅगनचा कब्जा
सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने सौरऊर्जेचे उत्पादन पाचपट वाढवण्याचे उद्दिष्ट ठरवले. सोलर उत्पादनांच्या बाजारपेठेत साहजिकच अचानक तेजी आली. सोलर मोड्युल व सेल्सची मागणी अनेक पटींनी वाढली. त्याचा सर्वाधिक
लाभ सोलर उत्पादने बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांऐवजी चिनी सोलर कंपन्यांनी उचलला.भारताने अमेरिका, मलेशिया व तैवान आदी देशांकडूनही या काळात सोलर उत्पादनांची आयात केली मात्र वर्षभरातच ती घटत गेली आणि चिनी उत्पादनांनी अल्पावधीत भारतीय बाजारपेठेचा कब्जा घेतला. गतवर्षापर्यंत भारतात चिनी सोलर उत्पादने ५0 टक्क्यांच्या आसपास खपत होती यंदा ही टक्केवारी थेट ७५ ते ८२ टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे.82%पर्यंत भारतीय बाजारपेठेत
चिनी सोलर उत्पादनांचे प्रमाण वाढल्याची माहिती मेरिकॉम कॅपिटल ग्रुपच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
>भारतीय कंपन्यांची निर्यात वाढली
मेरिकॉम कॅपिटलच्या अहवालानुसार पहिल्या तिमाहीत १२७ कोटींच्या सोलर उत्पादनांची निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्यांनी, चालू आर्थिक वर्षात २७४ कोटींपर्यंत आपल्या निर्यातीची मजल गाठली आहे. इटली, बेल्जियम, कॅनडा व अमेरिकेत भारतीय कंपन्यांची उत्पादने निर्यात होत आहेत. याखेरीज चीनमध्येही भारतीय सोलर उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण जवळपास १0 टक्के आहे.सोलर उत्पादने बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या निर्यातीत मात्र वर्षभरात 116% टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे.