Chinese EV Maker BYD ready to Enter In India: इलेक्ट्रिक कार आणि बॅटऱ्यांच्या निर्मितीसाठी जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या BYD या चिनी कंपनीनं भारतात इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटऱ्यांच्या निर्मितीसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. BYD स्थानिक कंपनीच्या सहकार्यानं भारतात उत्पादन करेल. यासाठी भारतीय नियामकांकडून परवानगी मागण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, चीनच्या BYD कंपनीनें स्थानिक कंपनीच्या भागीदारीत भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी बनवण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला आहे. खाजगी मालकीच्या हैदराबादस्थित मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरनं BYD सोबत हातमिळवणी केली असून त्यांनी भारतीय नियामकांना संयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्लांट उभारण्याची परवानगीदेखील मागितलीये.
उद्याप प्रतिक्रिया नाही
रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकालीन योजनेअंतर्गत बीव्हायडी हॅचबॅक ते लक्झरी मॉडेल अशी संपूर्ण सीरिज भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, बीव्हायडीनं मात्र या प्रकरणावर भाष्य केलेलं नाही. परंतु आपण भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्याची योजना आखली असल्याचं यापूर्वी कंपनीनं म्हटलं होतं.
तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ
भारत कारच्या दृष्टीनं जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावरील कंपन्या भारतात वेगाने एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी, इलॉन मस्क यांनी टेस्लाचा प्रकल्प भारतात उभारण्याची आणि २० लाखांत टेस्ला कार लाँच करण्याची योजना उघड केली होती.