पेईचिंग, दि. १४ - डोकलाम प्रश्नावरून गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीन या आशियातील दोन बलाढ्य देशांमधील संबंध ताणलेले आहेत. दोन्ही पक्ष माघार घेण्यास तयार नसल्याने तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, या तणावाचा परिणाम आर्थिक संबंधांवर होऊन दोन्ही देशांमध्ये आर्थिक युद्ध भडकण्याची शक्यता चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. डोकलाममध्ये लष्करी तणाव वाढल्यानंतर भारताने चीनमधून आयात होणाऱ्या ९३ उत्पादनांवर अतिरिक्त कर आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनमधील सत्ताधारी कम्युनिष्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने आपल्या एका लेखात चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करताना त्यातील जोखमीचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे. तसेच आपल्या आततायी निर्णयांच्या परिणामास सामोरे जाण्यासाठी तयार राहावे असा इशाराही या लेखातून देण्यात आला आहे. त्यामुळे चीन भारतातून येणाऱ्या उत्पादनांवर अधिकचा कर लावून याचा बदला घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनमधील भारतीय दुतावासाकडून प्रसिद्ध आकडेवारीचा संदर्भ घेत या लेखात भारत आणि चीनच्या व्यापारातील तफावत अधोरेखित करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार भारताची चीनमधील वार्षिक निर्यात १२.३ टक्क्यांनी घटून ११.७५ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. तर चीनकडून होत असलेला भारताची आयात दोन टक्क्यांनी वाढून ५९ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे हा व्यापार भारतासाठी ४७ अब्ज डॉलर एवढा त्रुटीचा आहे. भारताने गेल्या आठवड्यात चीनच्या ९३ उत्पादनांवर डंपिंगविरोधी कर लावल्याने दोन्ही देशांमध्ये आर्थिक युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आता भारताने प्रत्यक्षात असे केल्यास त्याचा फटका चीनला बसू शकतो. मात्र भारतावरही त्याचे विपरित परिणाम होतील. डोकलाम वादात मंदावणार नागपूर मेट्रोचा वेग?डोकलाम वादावर भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर चीनसोबत करण्यात आलेला नागपूर मेट्रो रेल्वेसाठी कोच खरेदी आणि कारखाना निर्मितीचा करार रद्द होऊ शकतो. त्यामुळे मेट्रोची ‘स्पीड’ मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्या अनुषंगाने उच्चस्तरीय वर्तुळात हालचाली सुरू झालेल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या वादावर पूर्णविराम लागल्यास मेट्रो रेल्वेच्या मार्गात निर्माण होवू पाहणार हा अडथळा लवकरच दूर होईल, असेही ‘मेट्रो रेल्वे’च्या उच्चपदस्थ वर्तुळात बोलले जात आहे.भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी आॅफ एकॉनॉमिक अफेअर्सने चीनी कंपनी सांघाई फोसूनतर्फे भारतीय कंपनी ग्लँड फार्मामध्ये मोठी हिस्सेदारी खरेदीवर निर्बंध लावले आहे. चीनी कंपनीने ग्लँड फार्मा खरेदीसाठी ८८०० कोटींची बोली लावली होती. याशिवाय चीनमधून आयात होणाºया वस्तूंवर सरकार अॅन्टी डम्पिंग ड्युटी लावण्याच्या तयारीत आहे. तसेच मेट्रो रेल्वेसाठी कोच खरेदी आणि कारखाना निर्मितीचा करार रद्द करावा, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या करारातील धोक्यांची जाणीव करून देण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकार कोचेस खरेदीसाठी चीनसोबत केलेला करार रद्द करण्याची शक्यता असून त्याचा परिणाम नागपुरातील मेट्रो रेल्वेच्या विकासावर होणार आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत नागपुरात मेट्रो रेल्वे सुरू होणार नसल्याचे संकेत आहेत.
भारतासोबत आर्थिक युद्ध भडकण्याचा चिनी प्रसारमाध्यमांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 5:24 PM