नवी दिल्ली : बहुतांशी चिनी कंपन्या भारतीय युजर्सची गोपनीय माहिती आपल्या देशात पाठवत असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने त्यांना नोटिसा बजावल्यानंतर या कंपन्यांनी आपले सर्व्हर स्टोअरेज भारतात हलविण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.भारतातील स्मार्टफोन्सची बाजारपेठ चिनी कंपन्यांनी काबीज केली आहे. देशात विकले जाणारे जवळपास निम्मे स्मार्टफोन चिनी कंपन्यांचे असतात. अत्यंत वाजवी दर व उत्तम फिचर्स यामुळे साहजिकच चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोन्सना ग्राहकांची पसंती मिळत आहे.मात्र बहुतांशी चिनी कंपन्या भारतीय युजर्सची गोपनीय माहिती चोरत असल्याचा आणि ती माहिती आपल्या देशात पाठवत असल्याचा संशय केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला आला. त्यामुळे सरकारने काही दिवसांपूर्वी २१ मोबाइल कंपन्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात अन्य देशांचे उत्पादकही होते. मात्र बहुसंख्य कंपन्या चीनच्या होत्या. डोकलामवरून भारत व चीनमध्ये तणावाचे वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर चिनी मोबाइल कंपन्यांच्या माहिती आपल्या देशात पाठवण्याच्या तक्रारींचा मुद्दा अधिकच गंभीर बनला. अलिबाबा या विख्यात चिनी समूहाच्या यूसी ब्राऊजरवरही असाच ठपका ठेवण्यात आला आहे. या अनुषंगाने चिनी कंपन्यांना आज म्हणजेच २८ आॅगस्टपर्यंत आपले म्हणणे सादर करण्याची वेळ देण्यात आली होती.मात्र त्याआधीच ओप्पो आणि विवो या प्रख्यात मोबाइल उत्पादक कंपन्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही चिनी कंपन्यांनी भारतीय युजर्सच्या माहिती साठा करण्यासाठीचे सर्व्हर्स चीनमधून भारतात हलविण्याची तयारी दाखविली आहे. या दोन्ही कंपन्या आपली माहिती अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टच्या चीनमधील सर्व्हरवर स्टोअर करतात. (वृत्तसंस्था)आता हे सर्व्हर आणि त्यावरील माहिती भारतात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ओप्पो आणि विवो तसेच अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी त्याबाबत प्रत्यक्षात जाहीरपणे काहीही भाष्य केलेले नाही. तथापि, केंद्र सरकारच्या ताठर भूमिकेमुळे चिनी कंपन्या नरमल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याचप्रमाणे शाओमी, जिओनी, लेनोवासह अन्य चिनी कंपन्यादेखील हाच मार्ग पत्करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चिनी मोबाइल कंपन्या भारतात सर्व्हर हलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:06 AM