लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या पोलादाचा उत्पादक असतानाही चीनमधून होणारी भारताची तयार पोलादाची भारताची आयात वाढून ६ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मागील १० महिन्यांत चीनमधून मोठ्या प्रमाणात पोलाद आयात झाल्यामुळे हा उच्चांक झाला आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार, या कालावधीत भारताची पोलाद मागणी १४.५ टक्के वाढून ११२.५ दशलक्ष मेट्रिक टनावर पोहोचली आहे. हा ६ वर्षांचा उच्चांक आहे. पुढील व्यावसायिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर जागतिक जीडीपीच्या वृद्धी दरापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलादाची मागणी आणखी वाढणार आहे.
चीनमधून सर्वाधिक आयात
या कालावधीत चीनमधून सर्वाधिक २.१८ दशलक्ष मेट्रिक टन पोलाद भारताने आयात केले. आदल्या वर्षीच्या तुलनेत ही आयात तब्बल ८० टक्के अधिक आहे. तसेच, हा मागील ६ वर्षांतील उच्चांक आहे.
भारत चीनमधून हॉट-रोल्ड आणि कोल्ड-रोल्ड पोलादाची आयात करतो. त्याचबरोबर गाल्व्हनाइज्ड प्लेन व कोरोगेटेड (नालीदार) शीटची तसेच पाइपची आयातही चीनमधून होते.
६.७ दशलक्ष टन पोलादाची आयात
nचालू वित्तीय वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी या कालावधीतदेशात एकूण ६.७ दशलक्ष मेट्रिक टन पोलादाची आयात करण्यात आली.
nमागच्या वर्षीच्या तुलनेत ती ३५ टक्के अधिक आहे. भारताला पोलाद पुरवणाऱ्या देशांत दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानी आहे.
nदक्षिण कोरियातून २.१५ दशलक्ष मेट्रिक टन पोलादाची आयात भारताने केली. हा ४ वर्षांतील उच्चांक आहे