यूकेस्थित चिप डिझायनर कंपनी आर्म होल्डिंग्सने आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात अमेरिकेतील चिप निर्माता Nvidia सोबत $40 बिलियनचा करार केला होता, परंतु करार पुढे गेला नाही. आता कंपनी यूएस आणि यूकेमधील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याच्या तयारीत आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ही कंपनी अॅपल आणि सॅमसंगसारख्या दिग्गजांसाठी चिप्स डिझाइन करते. त्या जगभरात स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरल्या जातात. कंपनीचे जगभरात अंदाजे 6,400 कर्मचारी आहेत. या दृष्टिकोनातून पाहिल्यास सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.
चिपची कमतरता
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, इतर कंपन्यांप्रमाणेच संधी आणि खर्च यांच्यात चांगला समन्वय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या व्यवसाय योजनेचे सतत पुनरावलोकन करत आहोत. दुर्दैवाने यामध्ये कंपनीच्या कर्मचार्यांच्या टाळेबंदीचाही समावेश आहे. जगात सध्या सेमीकंडक्टर चिप्सचा मोठा तुटवडा आहे आणि त्यामुळे अनेक उद्योगांना फटका बसला आहे. यामध्ये वाहन उद्योगाचाही समावेश आहे.
जापानी कंपनीची गुंतवणूक
कोरोनाच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विक्री वाढली, पण चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांची धडपड सुरू आहे. आर्ममध्ये जपानी फर्म SoftBank ची गुंतवणूक आहे. 2016 मध्ये सॉफ्टबँकेने आर्म कंपनी $32 बिलियन मध्ये खरेदी केली होती. यानंतर ही कंपनी Nvidia ला $ 40 अब्ज मध्ये विकण्याची योजनादेखील आखली. परंतु नियामक अडथळ्यांचे कारण देत सॉफ्टबँकेने यातून माघार घेतली.