Join us  

Nirmal Singh Bhangoo : चिटफंड घोटाळा, गुंतवणुकदारांचे ४५ हजार कोटी बुडवणाऱ्या आरोपीचा मृत्यू, पैशांचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 2:05 PM

Pearl Group - Nirmal Singh Bhangoo : दूध व्यवसायापासून सुरुवात करत पुढे फायनान्शियल फर्म उभी करणाऱ्या आणि शेवटी ४५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या निर्मल सिंह भंगू यांचा मृत्यू झाला आहे.मात्र निर्मल सिंह भंगू यांच्या निधनामुळे साडे ५ कोटी गुंतवणुकदारांच्या अडकलेल्या हजारो कोटी रुपयांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दूध व्यवसायापासून सुरुवात करत पुढे फायनान्शियल फर्म उभी करणाऱ्या आणि शेवटी ४५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या निर्मल सिंह भंगू यांचा मृत्यू झाला आहे. पर्ल्स गृपचे संस्थापक असलेल्या निर्मल सिंह भंगू यांनी अल्पशा आजारानंतर दिल्लीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिहार तुरुंगात असलेल्या भंगू यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मात्र निर्मल सिंह भंगू यांच्या निधनामुळे साडे ५ कोटी गुंतवणुकदारांच्या अडकलेल्या हजारो कोटी रुपयांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

भंगू यांच्या पर्ल्स ग्रुपच्या बचत योजनेमध्ये तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता.  या योजनेत पैसे गुंतवणाऱ्या साडे पाच कोटी गुंतवणुकदारांपैकी केवळ २१ लाख लोकांनाच त्यांचा गुंतवलेला पैसा परत मिळाला आहे. उर्वरित सव्वा पाच कोटी गुंतवणुकदार त्यांचे पैसे परत मिळण्याची वाट पाहत आहेत. 

पंजाबमधील एका गावात सायकलीवरून दूध विकणाऱ्या भंगू यांनी बघता बघता दोन लाख कोटी रुपयांचं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं होतं. घरोघरी दूध विकता विकता जीवनात काही तरी मोठं करण्याच्या इराद्याने ते कोलकाता येथे आले होते. इथे त्यांनी पीरलेस चिटफंड कंपनीमध्ये काम केलं. तिथे त्यांनी चिटफंड व्यवसायाचे बारकावे शिकले. पुढे वेगवेगळ्या कंपन्यात काम केल्यावर १९८० मध्ये स्वत:ची पर्ल्स गोल्ड फॉरेस्ट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. त्यामधून गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. काळाबरोबरच निर्मल सिंह भंगू याचा व्यापार वाढत गेला. मात्र दहा वर्षांपूर्वी २०१३-२०१४ च्या सुमारास पर्ल्स चिटफंड घोटाळ्याचा उलगडा झाला. तसेच ४५ हजार कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलं. 

पर्ल्स ग्रुपच्या या घोटाळ्यात सुमारे ५ कोटी गुंतवणुकदारांचे ४५ हजार कोटी रुपये बुडाले. मात्र काही जणांकडून ही रक्कम ६० हजाक कोटी असल्याचा दावा केला जातो. गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळावे, यासाठी २०१५ मध्ये लोढा समितीची स्थापना करण्यात आली. त्यामाध्यमातून आतापर्यंत केवळ २१ लाख गुंतवणुकदारांना पैसे परत मिळाले आहेत. तरीही अजून सव्वा पाच कोटी गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणे बाकी आहे.  

टॅग्स :धोकेबाजीगुंतवणूक