Join us  

चित्रा फसल्या; सुब्बूच होता हिमालयातील साधू, हॉटेल बुकिंगसह जिओटॅग छायाचित्राचे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 9:51 AM

चित्रा रामकृष्ण यांना सल्ला देणारा साधू हा दुसरा तिसरा कोणी नसून, आनंद सुब्रमण्यम (सुब्बू) हाच असल्याचे समोर आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्णय एका साधूच्या सल्ल्यानुसार घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना सल्ला देणारा साधू हा दुसरा तिसरा कोणी नसून, आनंद सुब्रमण्यम (सुब्बू) हाच असल्याचे समोर आले आहे. 

ईअँडवायने सांगितले की, एनएसईचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या चेन्नईतील घरापासून अवघ्या १३ मीटर अंतरावर हिमालयातील साधूने बुक केलेल्या हॉटेलचे (याचे पेमेंट आनंद सुब्रमण्यम यांनी केले होते) जिओटॅग छायाचित्र  समोर आली आहेत. साधू आणि सुब्रमण्यम यांच्या संभाषणात वापरलेली वाक्ये यावरून हिमालयातील साधू हा आनंद सुब्रमण्यम हाच असल्याचे समोर येते. चित्रा यांच्यावर शेअर बाजारातील गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने २०१८ मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सुब्रमण्यम यांना अटक केली आहे. चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमण्यम यांच्या नियुक्तीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि साधूशी एनएसईची गोपनीय माहिती शेअर केल्याच्या सेबीच्या अहवालानंतर ही अटक करण्यात आली असून, त्यांना कोठडी दिली आहे.

ईअँडवायचे निष्कर्ष जानेवारी २००० ते मे २०१८ दरम्यान चित्रा, सुब्रमण्यम आणि हिमालयातील साधू यांच्यात झालेल्या परस्परसंवादाच्या विश्लेषणावर आधारित आहेत. ईअँडवायने १७ ई-मेलचे विश्लेषण केले. यामध्ये आठ छायाचित्रांचा समावेश होता, त्यापैकी दोन जिओटॅग करण्यात आले होते. दोन्ही छायाचित्रांचे ठिकाण सुब्बू (सुब्रमण्यम) यांच्या चेन्नईतील निवासी पत्त्याच्या अगदी जवळ होते.

हॉटेलचे अडीच लाखांचे बिलही भरले

ईअँडवायने अहवालात म्हटले आहे की, उमेद भवन पॅलेसमध्ये केलेले हॉटेल बुकिंग हा आणखी एक पुरावा आहे. १ डिसेंबर २०१५ रोजी rigyajursama@outlook.com वरून चित्रा रामकृष्ण यांना ई-मेल पाठवण्यात आला. उमेद भवन येथे एमईच्या वतीने बुकिंग करण्यात आले आहे. सुब्बूच्या बँक स्टेटमेंटनुसार, २७ नोव्हेंबर २०१५ रोजी उमेद भवन पॅलेसला २३७९८४ रुपयांचे पेमेंट अगोदरच करण्यात आले होते.

साधू आणि सुब्रमण्यम यांची भाषा एकच

sironmani.१० वापरकर्ता प्रोफाइल नाव असलेले स्काईप खाते rigyajusama@outiook.com या ईमेल आयडीशी आणि मोबाइल क्रमांक ९१६७५७७४१२ (हा मोबाईल क्रमांक एनएसईने सुब्बुला दिला होता) शी लिंक केले होते. siromani.१० ने चित्रा यांच्याशी स्काईप चॅटमध्ये जी भाषा वापरली होती तीच भाषा rigyajursama@outlook.com वरून चित्रा यांच्याशी संवाद साधताना वापरण्यात आली, असा निष्कर्षही काढण्यात आला आहे. 

टॅग्स :शेअर बाजार