मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई टपाल विभागातर्फे मुंबईत ६ महिला टपाल कार्यालये शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. जीपीओ येथील टपाल विभागाच्या मुख्यालयात शनिवारी ११ वाजता मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या उपस्थितीत महिला टपाल कार्यालयांचे डिजिटल पद्धतीने लोकार्पण केले जाईल.
सर्व महिला कर्मचारी व अधिकारी असलेली ही टपाल कार्यालये वडाळा, अंधेरी येथील हनुमान रोड, गिरगाव येथील आंबेवाडी, पवई हाउसिंग कॉलनी, दौलतनगर आदी ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. या कार्यालयांत पोस्टमन ते पोस्टमास्टर या सर्व पदांवर महिला कार्यरत असतील. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी टपाल खात्याने यापूर्वी जानेवारी महिन्यात माहिम बाजार येथे सर्व महिला कर्मचारी व अधिकारी असलेले टपाल कार्यालय सुरू केले आहे; तर १२ एप्रिल २०१३ पासून मुंबईतील पहिले अशा प्रकारचे टपाल कार्यालय टाऊन हॉल येथे सुरू आहे.
पोस्टमास्टरपासून पोस्टमनपर्यंत सर्व पदांवर महिला कर्मचारी नियुक्त असून बचत बँक काउंटर, बहुउद्देशीय नोंदणी,आरक्षण काउंटर, आधार केंद्र, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांसारखी सर्व कामे त्या पाहतील. महिला सक्षमीकरणाच्या युगात महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती स्वाती पांडे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई विभागातील पोस्टमन शनिवारी टपाल घेऊन जाताना सोबत चॉकलेट घेऊन जाणार आहेत. ज्या घरी महिला दार उघडेल त्या ठिकाणी पोस्टमन त्या महिलेला महिला दिनाच्या शुभेच्छा देईल व चॉकलेट देईल. महिलेची परवानगी घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यात येणार आहे. टपाल खात्यातर्फे महिलांना शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून मुंबईतील २ हजार पोस्टमन प्र्रत्येकी ५० चॉकलेट देऊन शुभेच्छा देतील, अशी माहिती पांडे यांनी दिली.
पोस्टमन टपालासोबत देणार चॉकलेट व शुभेच्छा
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई टपाल विभागातर्फे मुंबईत ६ महिला टपाल कार्यालये शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:18 AM2020-03-07T00:18:02+5:302020-03-07T00:18:06+5:30