मुंबई : सोन्याच्या शुद्धतेबाबत ‘कॅरेट’ या परंपरागत प्रमाणाला आता स्वदेशी ‘बीएनडी’ (भारतीय निर्देशक द्रव्य) हा पर्याय उपलब्ध झाला आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतीय सरकारी मुद्रण संस्थेने (आयजीएम) ९९.९९ टक्के शुद्धतेचे हे ‘बीएनडी ४२०१’ प्रमाण सादर केले आहे.इटालियन ‘कॅरॉट’ या शब्दावरून सोन्याच्या शुद्धतेसाठी ‘कॅरेट’ हे प्रमाण जगभर मानले जाते. भारतातही त्याचा वापर केला जातो. मात्र, ‘मेक इन इंडिया’ला बळ देण्यासाठी स्वत:चे असे स्वदेशी प्रमाण तयार करण्याचा प्रयत्न भारतीय सुरक्षा मुद्रण व मुद्रा महामंडळाकडून दोन वर्षांपासून सुरू होता. हे शुद्धतेचे भारतीय प्रमाण विकसित करण्यात केंद्र सरकारच्या औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषदेचा (सीएसआयआर) मौल्यवान वाटा आहे. यामुळेच या शुद्धतेचा आधार घेत, विदेशातील मोठ्या अर्थव्यवस्थांना सोन्याची निर्यात होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत, असे मत सीएसआयआरच्या राष्टÑीय प्रयोगशाळेचे संचालक डॉ. डी. के. अस्वाल यांनी या निमित्ताने व्यक्त केले.येत्या काळात ‘बीएनडी’ हा शुद्धतेच्या २२, १८ आणि १४ कॅरेटलाही पूर्णपणे पर्याय ठरावा, असे आवाहन आयआयटी मुंबईचे प्रा. बी. एन. जगताप यांनी व्यक्त केले. सोन्यापाठोपाठ आता अन्य धातुंसाठीही बीएनडी प्रमाण निश्चित केले जाईल, असे आयजीएमचे महाव्यवस्थापक आर. हरिपंथ यांनी सांगितले.>आव्हान हॉलमार्किंगचे‘बीएनडी’ प्रमाण आले असले, तरी सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. हॉलमार्किंग अनिवार्य असताना, त्याच्या प्रयोगशाळांची कमतरता राज्यात आहे. महाराष्टÑात अशा ८६ प्रयोगशाळा आहेत.मात्र, त्यातील तब्बल ५० या केवळ मुंबई आणि नवी मुंबई परिसरात आहेत. पुण्यात १२ आहेत, तर अकोला, नागपूर आणि गोंदिया येथे सोन्याची मोठी बाजारपेठ असताना, या सर्वांसाठी केवळ नागपुरात एक प्रयोगशाळा आहे.संपूर्ण मराठवाड्यासाठी केवळ औरंगाबादेत प्रयोगशाळा आहे. सोबतच हॉलमार्किंगचे दागिने विक्रीसाठीचे परवाना शुल्कही भरमसाठ आहे. अशा स्थितीत बीएनडीचा प्रसार करणे आव्हानात्मक असेल.
कॅरेटला पर्याय बीएनडीचा, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत करणार विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:44 IST