लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील एक फरार आरोपी मेहुल चोक्सी याच्या गीतांजली जेम्स या कंपनीची उपकंपनी असलेल्या ‘नक्षत्र वर्ल्ड’ कंपनीस अवसायनात (लिक्विडेशन) काढण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने दिले आहेत. नक्षत्र वर्ल्ड कंपनीकडे आयसीआयसीआय बँकेचेही मोठे कर्ज थकले असून त्याच्या वसुलीसाठी बँकेने २०१९ मध्ये कंपनीविरुद्ध एनसीएलटीमध्ये दिवाळखोरी याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
एनसीएलटीने अवसायक म्हणून एएए इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स एलएलपीचे भागीदार शंतनू राय यांची नेमणूक केली आहे. आयसीआयसीआय बँकेने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. जानेवारी २०१८ मध्ये उघडकीस आलेल्या पीएनबी कर्ज घोटाळ्याचा सर्वाधिक लाभ मिळणाऱ्या कंपन्यांत चोकसी याच्या गीतांजली समूहाचा समावेश आहे. नक्षत्र वर्ल्ड ही कंपनी दागिन्यांचे डिझाईन आणि वितरण या क्षेत्रात काम करते. कंपनी जानेवारी २०१९ पासून दिवाळखोरी समाधान प्रक्रियेत होती. तथापि, कंपनी मनी लाँड्रिंग प्रकरणात गुंतलेली असल्यामुळे तिच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या होत्या. त्यामुळे दिवाळखोरी प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, समूहातील गीतांजली जेम्स आणि नक्षत्र ब्रँड्स या दोन कंपन्यांची दिवाळखोरी प्रकरणेही एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठासमोर प्रलंबित आहेत.