अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ख्रिसमस सण जगभरात उत्साहाने साजरा होत आहे. या नाताळाच्या सणात सांताक्लॉज सर्वांना भेटवस्तू देतो. ख्रिसमसचे औचित्य साधून किरकोळ व्यापाऱ्यांना आयकर विभागाने या सणानिमित्त काय भेटवस्तू दिली आहे?
कृष्णा (काल्पनिक पात्र) : अर्जुना, या नाताळाच्या सणात सर्वत्र भेटवस्तूंची आदानप्रदान होते. ८ नोव्हेंबरनंतर नोटाबंदीमुळे देशभरात रोख रकमेचा तुटवडा आहे. त्यामुळे बँकद्वारे पेमेंट करून भेटवस्तू घेतल्या जात आहेत. व्यापाऱ्याला त्याने कमविलेल्या नफ्यावर आयकर भरावा लागतो. आयकराच्या कलम ४४ एडीमध्ये उलाढालीच्या ८ टक्के नफा दाखविण्याचा पर्याय आधीपासूनच विशिष्ट व्यवसायिकांसाठी उदा. किराणा, मेडिकल, कापड, किरकोळ विक्रेते इत्यादी यांना शासनाने दिला आहे. प्रत्येक व्यावसायिकाला बँके द्वारे व्यवहार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी व व्यवहारामध्ये रोखीचा कमी वापर होण्यासाठी शासनाने आयकराच्या कलम ४४ एडीच्या तरतुदीमध्ये बदल करून बँकेद्वारे व्यवहार केले तर त्यावर ६ टक्के नफा दाखविण्याचा पर्याय दिला आहे. याविषयी आयकर विभागाने १९ डिसेंबर २०१६ रोजी प्रेसनोट जाहीर केली. येणाऱ्या अर्थसंकल्पाद्वारे कायद्यामध्ये बदल केला जाईल. जर ग्राहकांनी रोखीऐवजी बँकेद्वारे पेमेंट केल्यास त्याचा व्यावसायिकाला आयकरामध्ये फायदा होईल.
अर्जुन : कृष्णा, या कलम ‘४४ एडी’चा पर्याय कोणासाठी आहे?
कृष्णा : अर्जुना, कलम ४४ एडी अनुसार व्यापार करणारा करदाता ज्याची वार्षिक उलाढाल आर्थिक वर्ष २०१५-१६पर्यंत १ कोटीपेक्षा कमी असेल तर उलाढाल किंवा रिसिप्टच्या ८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नफा दाखवून त्यावर कर भरू शकतो. आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये ही १ कोटीची मर्यादा २ कोटी केली आहे. यामध्ये करदात्याला फक्त वार्षिक उलाढालीची माहिती ठेवणे आवश्यक आहे. करदात्याला संपूर्ण हिशोबाची पुस्तके (कलम ४४ अ अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे) ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे ही सरळ सोपी तरतूद आहे.
अर्जुन : कृष्णा, आयकरातील कलम ४४ एडी अंतर्गत ६ टक्के नफा दाखविण्याचा नवीन पर्याय कोणता?
कृष्णा : अर्जुना, रोख विक्रीस बंदी व बँकेद्वारे विक्रीस चालना देण्यासाठी हा नवीन पर्याय शासनाने आणला आहे. कलम ४४ एडी अंतर्गत रोख व्यवहार उलाढालीवर ८ टक्के व बँकेद्वारे उलाढालीवर ६ टक्के नफा घेता येईल. याआधी एकूण उलाढालीवर ८ टक्के नफा होता. या बदलामुळे करदात्याला बँकेद्वारे व्यवहार केल्यास २ टक्के नफ्यामध्ये सूट मिळू शकेल. उदा. जर एका कापड व्यापाऱ्याची वार्षिक उलाढाल किंवा रिसिप्ट रोखीने ५० लाख व बँकेद्वारे ३० लाख असे एकूण ८० लाख रुपये असेल तर तो ५० लाखांवर ८ टक्के नफा म्हणजेच ४ लाख रुपये व ३० लाखांवर ६ टक्के म्हणजेच १.८० लाख रुपये एकूण ५.८० लाख वर कर आकारणी होईल. यातून त्याला कलम ८०च्या वजावटी मिळतात व त्यानंतर स्लॅबअनुसार कर भरावा लागतो. कलम ४४ एडी अंतर्गत रीटर्न दाखल करावयाची ड्युडेट ३१ जुलै आहे.
अर्जुन : कृष्णा, हा कलम ४४ एडीचा पर्याय कोणकोणत्या करदात्यांसाठी उपलब्ध आहे?
कृष्णा : अर्जुना,
१) ती तरतूद फक्त वैयक्तिक, एचयूएफ व पार्टनरशिप फर्म करदात्यांना लागू होते. कंपनी, एलएलपी व इतर करदात्यांना ही तरतूद लागू होत नाही.
२) या तरतुदीमध्ये फक्त व्यापार करणारे भाग घेऊ शकतात. उदा. किरकोळ विक्रेता, घाऊक विक्रेता, उत्पादनक इ.
३) व्यावसायिकांसाठी उदा. डॉक्टर, सीए, अॅडव्होकेट इ. प्रोफेशन्सला ही तरतूद लागू होत नाही. तसेच जर करदात्याचे उत्पन्न कमिशन, ब्रोकरेज, एजन्सी व्यापार असेल किंवा मालवाहतुकीचा वापर असेल तर त्यांना ही तरतूद लागू होत नाही.
अर्जुन : कृष्णा, या कलम ४४ एडीच्या तरतुदीची इतर वैशिष्ट्ये कोणती?
कृष्णा : या तरतुदीची काही मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:-
१) करदाता यामध्ये स्वत:हून ८ व ६ टक्केपेक्षा जास्त नफा दाखवू शकतो.
२) आयकरातील कलम ३० ते ३८मधील म्हणजेच व्यापाराच्या इतर कोणत्याही खर्चाची वजावट करदात्याला मिळणार नाही.
३) तसेच आयकरातील कलम ४०, ४० अ, ४३ ब या अंतर्गत खर्चाचे डिअलॉवन्स होणार नाही. उदा. जर करदात्याने व्हॅट भरला नसेल तर त्याचा डिअलॉवन्स होणार नाही.
४) आयकर विभागाने या तरतुदीनुसार रीटर्न दाखल करण्यासाठी एक खूप सोपा फॉर्म आयटीआर ४ एस (सुगम) उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये करदात्याला रीटर्नमध्ये फक्त ३१ मार्च अखेर डेटर, क्रेडिटर, रोख, रोख रक्कम व स्टॉकची व्हॅल्यू याची माहिती नमूद करावी लागते.
५) सर्वांत महत्त्वाचे जर ८ ते ६ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नफा दाखवून कर भरला तर करदात्याची आयकर रीटर्न क्रुटीनीपासून सुटका होऊ शकते.
६) पार्टनरशिप फर्म असेल तर त्याला कलम ४० (बी) अंतर्गत पार्टनरचा पगार व व्याज याची वजावट २०१६-१७पासून मिळणार नाही.
७) या तरतुदीमध्ये नफा दाखविणाऱ्या करदात्याला अॅडव्हान्स टॅक्सचा वर्ष २०१६-१७पासून १५ मार्चला एक हप्ता भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, ८ किंवा ६ टक्के नफा न दाखविल्यास टॅक्स आॅडिटचा पर्याय कोणता?
कृष्णा : अर्जुन, जर करदात्याला १) नफा रोख उलाढालीच्या ८ टक्केपेक्षा कमी व बँकेद्वारे उलाढालीच्या ६ टक्केपेक्षा कमी असेल व २) त्याचे एकूण करपात्र उत्पन्न करमाफ मर्यादा (रुपये २.५)पेक्षा जास्त असेल तर त्याला हिशोबाची पुस्तके (कलम ४४ अ अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे) सांभाळावी लागतील. तसेच त्याला चार्टर्ड अकाउंटटकडून टॅक्स आॅडिट करून घ्यावे लागेल. उदा. जर कापड विक्रेत्याची वार्षिक उलाढाल (रोख किंवा बँकेद्वारे) ८० लाख रु. असेल व त्याचा नफा ४ टक्के म्हणजेच रु. ३,२०,००० असेल तर त्याला हिशोबाची पुस्तके सांभाळावी लागतील व टॅक्स आॅडिट करून घ्यावे लागेल. करदात्याने व्यापाऱ्याचा नफा व इतर खर्च लक्षात घेऊन योग्य तो पर्याय निवडावा. जर या अंतर्गत टॅक्स आॅडिट करावयाचे असेल तर रीटर्न दाखल करावयाची ड्युडेट ३० सप्टेंबर आहे. एकदा आॅडिट केल्यास पुढील पाच वर्षे आॅडिट करावेच लागेल व ८ किंवा ६ टक्के नफ्याच्या तरतुदीचा फायदा घेता येणार नाही. याकरिता काळजीपूर्वक निर्णय घेऊनच पर्याय निवडावा.
- सी.ए. उमेश शर्मा
करबुडव्यांसाठी नवे वर्ष ठरेल धोक्याचे!
नवीन वर्ष २०१७ हे व्यापारात बँकिंग सुविधाद्वारे व्यवहार करावयाचे वर्ष असणार आहे. यापुढे नगदी व्यापार जसा मोकाटपणे चालत होता तसे आता होणार नाही.
पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात अजूनही बदल व्यापारात व आयकरात येतील. सांताक्लॉज जसे सुख, समृद्धीचे भेटवस्तू आणि आशीर्वाद देतो त्याप्रमाणे येणाऱ्या अर्थसंकल्पात इमानदार व बँकिंगद्वारे व्यापार करणाऱ्या करदात्याला अनेक भेटवस्तूदायक तरतुदी आणि करबुडव्यांना शिक्षादायक तरतुदी येतील. म्हणून सर्वांनी नवीन वर्षात बँकद्वारे व्यवहार करून आनंदी राहावे.