Join us  

सिगारेटवरील सेसचा एलआयसीला फटका! बुडाले ७ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 6:33 PM

जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयानंतर तंबाखू कंपनी आयटीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - जीएसटी कौन्सिलने  सिगारेटवर सेस लावण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयानंतर तंबाखू कंपनी आयटीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली.  या घसरणीचा थेट फटका आयटीसीमधील सर्वात मोठी भागधारक असलेल्या एलआयसीला बसला. पहिल्या अर्ध्या तासामध्येच एलआयसीचे सात हजार कोटींचे नुकसान झाले. आज शेअरमध्ये झालेली १५ टक्क्यांची घसरण ही आयटीसीच्या शेअरमध्ये १९९२ नंतरची सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगितले जात आहे.
आघाडीची तंबाखू कंपनी असलेल्या इंडिया टोबॅको कंपनी (आयटीसी) मध्ये एलआयसीचे सर्वाधिक शेअर आहेत. ३१ मार्च २०१७ च्या आकडेवारीनुसार आयटीसामध्ये एलआयसीचे १६.२९ टक्के समभाग आहेत. आयटीसीच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत विमा कंपन्यांचे सुमारे दहा हजार कोटींचे नुकसान झाले. तर एफपीआय कंपन्यांना ९ हजार कोटींचा फटका बसला.
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने गेल्या चार वर्षांपासून आयटीसीमध्ये आपले शेअर वाढवले आहेत. २०१३ साली एलआयसीचे आयटीसीमध्ये १२.१७ टक्के शेअर होते. एलआयसीचे चेअरमन व्ही. के. शर्मा यांनी  काही दिवसांपूर्वीच तंबाखू कंपन्यांमधील सरकारी मालकीच्या विमा कंपन्यांच्या समभागांचा बचाव केला होता. कुठल्याही कंपनीचे समभाग करणे वा न करणे याचा धुम्रपानाशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 
याचवर्षी एप्रिल महिन्यात सरकारी मालकीच्या विमा कंपन्यांच्या तंबाखू कंपन्यांमधील गुंतवणुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तंबाखूमुळे भारतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान, जीएसटी कौन्सिलने तंबाखूवर सेस लावण्याचा निर्णय घेतल्यावर आयटीसीच्या शेअरमध्ये १५ टक्क्यांची घसरण झाली होती.