PM Modi at the CII post-budget conference: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यानंतर मंगळवारी अर्थसंकल्पानंतर सीआयआयच्या कॉन्फरन्समध्ये संबोधित करताना आपल्या तिसऱ्या कार्यकाळातच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "भारताची अर्थव्यवस्था ८ टक्क्यांच्या दरानं वाढत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल आणि तो दिवस आता दूर नाही," असं मोदी म्हणाले.
"कोरोना महासाथीचा सामना केल्यानंतर आम्ही आता भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे. आमच्या सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात बजेटचा आकार तिपटीनं वाढून ४८ लाख कोटी रुपये झाला आहे," असं पंतप्रधान मोदी संबोधित करताना म्हणाले. कॅपिटल एक्सपेंडिचर १० वर्षांमध्ये पाच पटींनी वाढून ११.११ लाख कोटी रुपयांच्या पार गेला. गेल्या १० वर्षांमध्ये मंत्रालयांच्या वाटपात विक्रमी वाढ केली आहे, तर कराचे दर विक्रमी नीचांकी पातळीवर आल्याचेही त्यांनी नमूद केलं.
कमी महागाई असलेला एकमेव देश
"सरकार ज्या वेगानं आणि ज्या पातळीवर पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे ते अभूतपूर्व आहे. उच्च विकास दर आणि कमी महागाई असलेला भारत हा एकमेव देश आहे आणि जागतिक विकासात भारताचा वाटा १६ टक्के आहे. गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आलं. जीवन सुलभ करणं, कौशल्य विकास, रोजगार यावर आमचा भर आहे," असं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.
उत्पादन क्षेत्राचं चित्र बदललं
गेल्या १० वर्षांत उत्पादन क्षेत्राचं चित्र बदललं आहे. कोट्यवधी रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्यामुळे एमएसएमई क्षेत्रावर आमचं अधिक लक्ष आहे. आज भारतात १.४० लाख स्टार्टअप्स आहेत आणि ८ कोटी लोकांनी मुद्रा लोनद्वारे आपला व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- "आज भारत ८% वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील ५ वी सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल."
- "मागील सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प २०१३-१४ मध्ये आला तेव्हा तो १६ लाख कोटी रुपयांचा होता. आज आमच्या सरकारमध्ये अर्थसंकल्प तीन पटीनं वाढून ४८ लाख कोटी रुपये झाला आहे."
- "आज सर्व देश कमी विकास दर आणि मोठ्या महागाईच्या संकटाचा सामना करत आहेत. पण भारत हा एकमेव असा देश आहे जिथे विकास दर अधिक आणि कमी महागाई आहे."
- "गेल्या १० वर्षांत अर्थव्यवस्थेला धक्का देणारी अनेक संकटं आली असतानाही भारतानं ही वाढ साध्य केली आहे. आम्ही प्रत्येक संकटाशी लढा दिला, प्रत्येक आव्हानांचा सामना केला. ही संकटं नसती तर भारत आज जिथे पोहोचलाय, त्यापेक्षाही अधिक उंचीवर पोहोचला असता."
- "जगभरातील गुंतवणूकदार भारतात येण्यास इच्छुक आहेत. उद्योगासाठी ही सुवर्णसंधी असून आपण ती गमावली नाही पाहिजे. एक गरीब देश म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण २०४७ मध्ये विकसित देश म्हणून आपण आपला १०० वा स्वातंत्र्यदिन साजरा करू.