अमेरिकेचा सिटी बँक समूह भारतानंतर आता मेक्सिकोसोमधून व्यवसाय गुंडाळण्याच्या विचारात आहे. सिटीग्रुप इंक.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर यांनी मेक्सिकोमधील रिटेल-बँकिंग ऑपरेशन्समधून बाहेर पडण्याची योजना तयार केली जात असल्याची माहिती दिली आहे.
"मेक्सिको ही आमच्यासाठी एक प्राधान्य असलेली बाजारपेठ आहे. मेक्सिकोमधील ग्राहक, लघु-व्यवसाय आणि मध्यम-बाजारातील बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय हा आमच्या धोरणाचा एक भाग आहे," अशी प्रतिक्रिया फ्रेजर यांनी दिली. दरम्यान, सिटी बँक समूह आपला इन्स्टिट्युशनल व्यवसाय देशात सुरू ठेवेल. मेक्सिकोमध्ये सिटीग्रुपचं सर्वात मोठं ब्रान्च नेटवर्क आहे.
सिटीग्रुपला सुलभ करण्याचा आणि अधिक किफायतशीर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत आशिया आणि युरोपातील १३ देशांच्या बाजारातून बाहेर पडण्याची रणनीती आखण्यात आली होती, असं फ्रेझर यांनी गेल्या वर्षी जाहीर केलं होतं.
भारतातूनही गाशा गुंडाळणारयापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये सिटी बँकेने भारतातून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या बँकेचा ग्राहक व्यवसाय विकत घेण्याच्या शर्यतीत खाजगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक आघाडीवर असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. सिटी बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायामध्ये क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, गृह कर्ज आणि मालमत्ता व्यवस्थापन समाविष्ट आहे.बँकेच्या भारतात ३५ शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे ४,००० कर्मचारी कार्यरत आहेत. सिटी बँकेने १९०२ मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला आणि १९८५ मध्ये ग्राहक बँकिंग व्यवसायात प्रवेश केला.