Join us

सिटी बँकेच्या नफ्यात वर्षभरातच १.४३ कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:40 AM

तीन वर्षांत एनपीए अडीचपट, २०१६-१७ चा ताळेबंदही जाहीर नाही

मुंबई : खासदार आनंद अडसुळ यांच्या सिटी को-आॅप. बँकेच्या नफ्यात वर्षभरात तब्बल सव्वा कोटी रुपयांहून मोठी घट झाली. त्याचवेळी तीन वर्षांतच एनपीए अडीचपट वाढला. यानंतरच रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने ५३४ कोटी रुपयांच्या ठेवी संकटात आल्या आहेत.खासदार आनंद अडसुळ अध्यक्ष व त्यांचे सुपुत्र माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळ संचालक असलेल्या दी सिटी को-आॅप. बँकेवर रिझर्व्ह बँकेने बुधवारी सहकार कायद्याच्या कलम ३५ अंतर्गत निर्बंध आणले. यामुळे ठेवीदारांना आता १००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. पण बँकेची ढासळती आर्थिक स्थिती हेच रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचे खरे कारण ठरले आहे.बँक २०१० पासून सातत्याने नफ्यात असली तरी नफ्यात मोठे चढ-उतार झाले. मार्च २०१४ अखेर ३४ लाख रुपयांनी घसरलेल्या नफ्यात मार्च २०१५ अखेर जवळपास ४५ लाखांची वाढ झाली. पण वर्षभरातच मार्च २०१६ अखेर बँकेच्या नफ्यात तब्बल १.४३ कोटी रुपयांची घट झाली.याच वर्षात बँकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) ८.८४ टक्क्यांवर पोहोचले. मार्च २०१३ अखेर बँकेतील एनपीएचे प्रमाण ३.४९ टक्के होते. याचा अर्थ फक्त तीन वर्षांत बँकेच्या एनपीएमध्ये तब्बल अडीचपट वाढ झाली. बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे निकाल व ताळेबंदच जाहीर केलेले नाही. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईचे हेही एक कारण ठरले आहे. सुदैवाने बँकेचे सीआरएआर (आर्थिक तरलता) प्रमाण १०.१६ टक्क्यांसह समाधानकारक आहे.व्याजदर आश्चर्यकारकरीत्या वेगळेसहकारी बँकांचे ठेवींवरील व्याजदर राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा कायम अधिक असतात. पण सिटी को-आॅप. बँकेचे ठेवींवरील व्याजदर हे अन्य सहकारी बँकांपेक्षा कमी आहेत, तर कर्जावरील व्याजदर मात्र अन्य सहकारी बँकांसारखेच अधिक आहेत.

बँकेची स्थिती अशी (मार्च २०१६ अखेर)एकूण ठेवी : ५३४.२४ कोटी रु.एकूण कर्जवाटप : ३६२.५८ कोटी रु.एनपीए : ८.८४ टक्केनफा : १४.७९ लाख रु. (आधी १.५७ कोटी रु.)राखीव निधी : ४४.८९ कोटी रु.

टॅग्स :बँक